HSC Maharashtra Board 12th Result 2026 On mahresult.nic.in: उद्या, २ मे रोजी जाहीर होणार बारावीचा निकाल, 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली असून, शनिवार २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने गुरुवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. त्यानुसार, शनिवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील. यंदा राज्यातून १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.
दुपारी १ वाजता लिंक सक्रिय होणार
मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी प्रसिद्ध केला जाईल. विज्ञान, वाणिज्य, कला आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा सर्व शाखांचा निकाल एकत्रितपणे जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत पोर्टल्सवर निकालाची लिंक सक्रिय केली जाईल.
निकाल कुठे पाहायचा? (अधिकृत संकेतस्थळे)
विद्यार्थ्यांना आपला निकाल खालीलपैकी कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल:
mahresult.nic.in
.mkcl.org
mahahsscboard.in
results.digilocker.gov.in
यासोबतच विद्यार्थी 'डिजीलॉकर' (DigiLocker) ॲपच्या माध्यमातूनही आपली डिजिटल गुणपत्रिका पाहू आणि डाउनलोड करू शकतील.
निकाल पाहण्याची पद्धत
१. वर दिलेल्या कोणत्याही एका अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२. होमपेजवर 'HSC Examination March 2026 Result' या लिंकवर क्लिक करा.
३. आपला सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
४. 'View Result' बटणावर क्लिक करा.
५. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआउट किंवा पीडीएफ कॉपी जतन करा.
परीक्षेची पार्श्वभूमी
यंदा बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.२० लाख मुले आणि ७.१२ लाख मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींच्या संख्येत सुमारे २७ हजारांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला होता, त्यामुळे यंदा निकालाची टक्केवारी वाढणार का, याची उत्सुकता शिक्षण क्षेत्रात आहे.