युक्रेन मधून भारतात आलेल्या वैद्यकीय पदवीधारकांना देशात Internship पूर्ण करण्याची मुभा
युक्रेनमधील (Ukraine) युद्धाच्या परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण मागे सोडत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर शिक्षणाचा प्रश्न आहे. पण आता या विद्यार्थ्यांना भारताकडून दिलासा देण्यात आला आहे. युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांची अपूर्ण राहिलेली इंटर्नशीप (Internship) भारतात पूर्ण करता येणार आहे. India's Medical Regulatory Body कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यासाठी एक स्क्रिनिंग टेस्ट द्यावी लागणार आहे.
National Medical Commission (NMC) कडून जारी करण्यात आलेल्या नोटीशीनुसार, 'भारतात इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर अशांच्या अर्जांवर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते.' या निर्णयाचा फायदा युक्रेनमधील शेकडो भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतचा निर्णय विचाराधीन होताच मात्र आता योगायोगाने तो युक्रेन-रशिया युद्ध परिस्थितीमुळे जाहीर होत आहे असे ANI वृत्तसंस्थेने काही सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) द्वारे घेतलेली फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) भारतामध्ये नोंदणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उत्तीर्ण केले पाहिजे हे राज्य वैद्यकीय परिषदेने सुनिश्चित करण्याचेही स्पष्ट केले आहे. जर पात्रता निकष पूर्ण होत असतील तर राज्य वैद्यकीय परिषद 12 महिन्यांसाठी इंटर्नशीप किंवा बॅलंस पिरेड साठी त्यांचे रजिस्ट्रेशन मान्य केले जाऊ शकते.
एनएमसीने म्हटले आहे की, राज्य वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय महाविद्यालयाकडून एक हमीपत्र घ्यावे की परदेशी वैद्यकीय पदवीधरांकडून (एफएमजी) त्यांना इंटर्नशिप करण्याची परवानगी देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एफएमजींना मिळणारे स्टायपेंड आणि इतर सुविधा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित भारतीय वैद्यकीय पदवीधरांच्या बरोबरीने वाढवल्या जाव्यात जे संबंधित यंत्रणांनी निश्चित केलेले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून केंद्राला विनंती केली होती की मायदेशी परत आलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य वितरित वितरणाद्वारे देशातील विद्यमान वैद्यकीय कॉलेजेसमध्ये समाविष्ट करून घ्यावे.