बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन, पुणे यांनी संयुक्तपणे तयार केलेले Easy-Test ई-लर्निंग अॅप राज्यातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना खुले
याचा मोठा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. गेले अनेक महिने शाळा बंद असल्याने सरकारने आता डिजिटल शिक्षणावरील भर वाढवला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाकाळात सध्या अनेक गोष्टी बंद आहेत. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. गेले अनेक महिने शाळा बंद असल्याने सरकारने आता डिजिटल शिक्षणावरील भर वाढवला आहे. कोरोनाच्या या संकटकाळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन, पुणे यांनी संयुक्तपणे इझीटेस्ट (Easy-Test) हे ई-लर्निंग हे अॅप (E-Learning App) तयार केले आहे. राज्यस्तरावर आज या अॅपचे लोकार्पण केले गेले. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता-देता येणार आहे.
सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वेबिनारद्वारे या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास सोप्या शब्दांत समजावा म्हणून अॅपमध्ये व्हिडीओ, ग्राफिक्सचा उपयोग केला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. याआधी हे ॲप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले होते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या ॲपद्वारे मोफत ऑनलाईन धडे घेतले. आज या ॲपचे राज्यस्तरावर लोकार्पण करण्यात आले. (हेही वाचा: सरकारने सुरु केले 1 ली ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी 4 YouTube Channels व 3 री ते 12 वी साठी जिओ टी.व्ही वर 12 Channel)
इझीटेस्ट या ॲपमध्ये बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी अभ्यासक्रमाला अनुसरून तयार केलेले ऑनलाईन लेक्चर्स युट्युबच्या माध्यमातून अपलोड केले जातात तसेच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्न – शंकांचे समाधान करण्यात येते. या ॲपला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता हे ॲप राज्यातील अकरावी बारावीमध्ये प्रवेश घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. इझीटेस्ट हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये तब्बल 700 तासांची रेकॉर्डिंग असलेले ऑनलाईन वर्ग (Classroom) पद्धतीने विषय पाठनिहाय अपलोड केलेले आहेत. याद्वारे आता अकरावी–बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत धडे व प्रश्नोत्तरे मिळवता येणार आहेत.