BMC Civic Schools: नागरी शाळांसाठी मुंबई महापालिकेला मिळणार 65 नव्या इमारती
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांनी बांधलेल्या एकूण 65 इमारती, नागरी शाळांसाठी (Civic Schools Mumbai) जागेची आवश्यकता असल्याने बीएमसीकडे (BMC) हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांनी बांधलेल्या एकूण 65 इमारती, नागरी शाळांसाठी (Civic Schools Mumbai) जागेची आवश्यकता असल्याने बीएमसीकडे (BMC) हस्तांतरित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत आठ इमारती पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. इतर इमारती आगामी काळात पालिकेला देण्यात येतील. त्यामुळे शाळांच्या इमारतीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, या शैक्षणिक वर्षात सुमारे 1.25 लाख विद्यार्थ्यांनी नागरी शाळांमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे बीएमसीकडे वर्गखोल्या कमी पडत आहेत. शहर विकास आराखड्यानुसार काही जागा बीएमसी शाळांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. म्हाडा आणि एसआरए आरक्षित भूखंडांवर संरचना बांधतात आणि नंतर ते बीएमसीकडे सुपूर्द करतात. परंतु या इमारतींचा ताबा घेण्यापूर्वी नागरी संस्थेला विविध राज्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या काही परवानग्या आवश्यक असतात. त्या घेतल्यानंतरच इमारतींचे हस्तांतरण पूर्ण केले जाते. (हेही वाचा, JEE Advanced Result 2022 Declared: जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल jeeadv.ac.in वर जाहीर; इथे पहा स्कोअरकार्ड)
दरम्यान, राज्य विभाग आणि अग्निशमन दलाकडून विविध परवानग्या मिळवणे. त्यानंतर इमारतींचा ताबा देणे या प्रक्रिया म्हणजे गोगलगायीच्या वेगाने पुढे जाणे आहे. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, कारण 2013 पासून काही बांधकामे तयार आहेत. परंतू प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे त्यांचा ताबा अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत, बीएमसीने 3-7 मजल्यांच्या आठ इमारतींसाठी परवानग्या घेतल्या आहेत.
बीएमसीचे सहआयुक्त (शिक्षण आणि दक्षता) अजित कुंभार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही आठ इमारतींमध्ये वर्गखोल्या सुरू केल्या आहेत. उर्वरित इमारतींचा ताबा टप्प्याटप्प्याने मिळेल. सध्याच्या इमारती मोडकळीस आल्यास विद्यार्थ्यांना नवीन इमारतींमध्ये स्थलांतरित केले जाईल. अन्यथा, आम्ही या नवीन इमारतींमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या सुरू करू.