Diwali 2023: ग्राहकांच्या उत्साहामुळे यंदाच्या दिवाळीत मोडले व्यवसायाचे सर्व रेकॉर्ड; तब्बल 3.75 लाख कोटी रुपयांची झाली विक्री

देशातील व्यापाऱ्यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणत्याही वस्तू आयात केल्या नाही

Diwali Shopping (संग्रहित संपादित प्रतिमा)

दरवर्षीच दिवाळी (Diwali 2023) हा सण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर ठरतो. यंदा दिवाळीच्या काळात ग्राहकांकडून जोरदार मागणी असल्याने देशभरातील बाजारपेठांमध्ये विक्रमी व्यवसाय झाला आहे. ट्रेडर्स फेडरेशन कॅटनुसार (CAT), या दिवाळीत 3.75 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी व्यापार झाला आहे. दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा आणि तुळशी विवाह हे सण अजून यायचे आहेत, ज्यामध्ये सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा अधिक व्यवसाय अपेक्षित आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’साठीच्या आवाजाची जादू लोकांच्या मनावर काम करत आहे आणि त्यामुळे चीनचे व्यापारात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ते पुढे म्हणाले की, पूर्वी दिवाळीच्या सणात चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठेतील 70 टक्के जागा व्यापली होती, जे यावेळी शक्य झाले नाही. देशातील व्यापाऱ्यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणत्याही वस्तू आयात केल्या नाहीत. (हेही वाचा: Indian Share Market News: दिवाळीमुहूर्त ट्रेडिंगनंतर वधारलेला भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या सुरुवातीला मंदावला; घ्या जाणून)

प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, अंदाजानुसार, 3.5 लाख कोटी रुपयांच्या व्यवसायात सुमारे 13% वाटा अन्न आणि किराणा, 9% दागिने, 12% कपडे, 4% सुका मेवा, मिठाई आणि स्नॅक्स, 3 टक्के घराची सजावट साहित्य, 6% सौंदर्य प्रसाधने, 8% इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल, 3% पूजा सामग्री आणि साहित्य, 3% भांडी आणि स्वयंपाकघर उपकरणे, 2% बेकरी उत्पादने, 8% भेटवस्तू, 4% फर्निचर आणि उर्वरित 20 % ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, खेळणी आणि इतर अनेक वस्तूंचा आहे. या दिवाळीत देशभरातील पॅकिंग व्यवसायालाही मोठी बाजारपेठ मिळाली आहे.

यापूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशीही 30 हजार कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीची खरेदी-विक्री झाली होती. याआधी सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचा विक्रमी आकडा 27,000 कोटी रुपये होता. 2022 मध्ये धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचा व्यवसाय 25,000 कोटी रुपयांचा होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीमध्ये देशातील स्थानिकांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते, ज्याचा मोठा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला. देशातील सर्व शहरांत स्थानिक उत्पादक, कारागीर आणि कलाकारांनी बनवलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.