Go First वर DGCA ची मोठी कारवाई; विमान कंपनीला 10 लाखांचा दंड; 50 प्रवाशांना सोडून केलं होत उड्डाण
बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या GoFirst विमानाने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची वाट न पाहता टेकऑफ केल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता.
DGCA Fine to Go First Airline: एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघूशंका केल्याच्या घटनेपासून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) एअरलाइन्सवर बारीक लक्ष ठेवून आहे. दरम्यान, गो फर्स्टच्या घटनेसाठी डीजीसीएने शुक्रवारी विमान कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. 9 जानेवारी 2023 रोजी बेंगळुरूहून दिल्लीला जाणारे GoFirst Flight G8-116 ने बेंगळुरू (Bengaluru) विमानतळावर 55 प्रवाशांना सोडून टेकऑफ केले होते.
या प्रकरणाबाबत DGCA ने GoFirst ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि त्यांच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा केली होती. मात्र, GoFirst ने 25 जानेवारीला कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, विमानात प्रवाशांच्या बसण्याबाबत टर्मिनल समन्वयक, व्यावसायिक कर्मचारी आणि क्रू मेंबर्समध्ये अयोग्य संवाद आणि समन्वय होता. (हेही वाचा - DGCA Advisory for Flights: विमानात असभ्य वर्तन करणाऱ्यांची आता खैर नाही! डीजीसीएने जारी केली खास अॅडव्हायजरी)
विमान कंपनीला दंड -
9 जानेवारीच्या घटनेसाठी डीजीसीएने गोफर्स्टला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या GoFirst विमानाने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची वाट न पाहता टेकऑफ केल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. G8-116 विमानाने सकाळी 6:40 वाजता उड्डाण केले आणि प्रवाशांना खाली उतरवले. या घटनेनंतर काही प्रवाशांनी इंटरनेटच्या माध्यमातून तक्रारी केल्या.
एका निवेदनात, DGCA ने म्हटले आहे की, ग्राउंड हँडलिंग, लोड आणि ट्रिम शीट तयार करणे, फ्लाइट डिस्पॅच आणि प्रवासी/कार्गो हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था सुनिश्चित करण्यात एअरलाइन अयशस्वी ठरली.