Jet Airways च्या प्रवाशांना दिलासा; तिकिटांचे पैसे मिळणार परत किंवा केली जाणार पर्यायी व्यवस्था
प्रवाशांना त्यांच्या विमान प्रवासाच्या तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करावेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) जेट एअरवेजला दिले आहेत.
आर्थिक संकटांचा सामना करत डबघाईला आलेली कंपनी जेट एअरवेज (Jet Airways)अखेर बंद झाली. मात्र कंपनी बंद झाल्याचा फटका कर्मचारी आणि ग्राहकांना बसला. हजारो लोकांची नोकरी यामुळे गेली तर कित्येक ग्राहकांनी आधीच बुक केलेल्या तिकिटांचे पैसे बुडाले. गेल्या कित्येक दिवसांपासून याबाबत आंदोलन सुरु होते, याबाबत दिलासा देणारी एक घटना घडली आहे. प्रवाशांना त्यांच्या विमान प्रवासाच्या तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करावेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) जेट एअरवेजला दिले आहेत.
17 एप्रिलपासून जेट बंदी पडली, मात्र त्याआधी अनेक ग्राहकांनी आगामी प्रवासाची तिकिटे बुक केली होती. अशा प्रवाशांचे पैसे आता परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्या. ए. जे. भंभानी यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान जेट व डीजीसीएला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. ज्या अंतर्गत प्रवाशांचे पैसे परत द्यावेत अथवा, पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी नोटीस जारी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता बीजोन कुमार मिश्रा यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 16 जुलैला होणार आहे. (हेही वाचा: Jet Airways Shutdown: तुम्ही Jet Airways ची तिकिटं बुक केली आहेत? त्याचा रिफंड कुठे मिळवाल?)
दरम्यान, कंपनी बंद पडल्याने सर्वात जास्त नुकसान कर्मचाऱ्यांचे झाले आहे. गेले 3 महिने कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही, आता तर त्यांची नोकरीही गेली. काल महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ते सहार पोलीस ठाणे पर्यंत मोर्चा काढला. दरम्यान स्पाइसजेट, विस्तारा, एअर इंडिया अशा कंपन्यांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना आधार म्हणून त्यांना निकारी देण्यास सुरुवात केली आहे.