Coronavirus Updates in India: भारतात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात 3,46,786 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 2,624 जणांचा बळी

अशी परिस्थिती आजपर्यंत जगातील कोणत्याही देशात पाहिली गेली नाही. यापूर्वी अमेरिकेत दोन वेगवेगळ्या दिवशी चार लाख आणि तीन लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली होती.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus Updates in India: देशात कोरोना संसर्गाचा कहर आणखी थांबलेला दिसत नाही. सलग तिसर्‍या दिवशी देशात तीन लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. शुक्रवारी देशात एकूण 3.46 लाख प्रकरणे नोंदली गेली असून 2624 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह, भारतात तीन दिवसांत एकूण कोरोना प्रकरणे 9.94 लाखांवर पोचली आहेत. अशी परिस्थिती आजपर्यंत जगातील कोणत्याही देशात पाहिली गेली नाही. यापूर्वी अमेरिकेत दोन वेगवेगळ्या दिवशी चार लाख आणि तीन लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली होती. आज सलग चौथा दिवस आहे, जेव्हा देशात 2000 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

दरम्यान, गेल्या 24 तासात भारतात 3,46,786 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 2,624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 2,19,838 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,66,10,481 इतकी झाली असून कोरोनावर मात केलेल्याची संख्या 1,38,67,997 इतकी आहे. मात्र, कोरोना विषाणूने आतापर्यंत देशातील 1,89,544 नागरिकांचा बळी घेतला आहे. सध्या देशात 25,52,940 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (वाचा - Rajasthan: लॉकडाऊनमुळे महिला कॉन्स्टेबलला मिळाली नाही रजा; पोलिस ठाण्यातचं लावली हळद, पहा फोटो)

गेल्या 24 तासांत संपूर्ण जगात एकूण 8.9 लाख प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 37 टक्के रुग्ण हे एकट्या भारतातील आहेत. गुरुवारी ब्राझीलमध्ये 79,719, अमेरिकेत 62,642 आणि तुर्कीमध्ये 54,791 प्रकरणे नोंदली गेली. जगात हे देश कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित ठरले आहेत. परंतु भारताने या सर्वांना मागे टाकले आहे.

मुंबई आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर माजला आहे. परंतु, आता बंगळुरूमध्येही प्रचंड कोरोना संक्रमणाची प्रकरणे दिसून आली. देशातील इतर शहराच्या तुलनेत बंगळुरुमध्ये सर्वाधिक 1.5 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. तर पुण्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 1.2 लाख आहे. सर्वाधिक प्रभावित 10 शहरांपैकी पाच शहरे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि नाशिक शहरांचा समावेश आहे.