Covid-19 Cases In India: देशात झपाट्याने पसरतोय कोरोना व्हायरस; गेल्या 24 तासांत 5 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा चिंतेचा विषय बनला आहे.
Covid-19 Cases In India: देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड 19 चे विक्रमी 5,335 नवीन रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, सक्रिय रुग्णांची संख्या 25,587 वर पोहोचली आहे. प्रदीर्घ काळानंतर देशात एकाच दिवसात 5000 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी देखील कोरोनाचे 4435 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक राज्यांच्या रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढली आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने कोरोनावरील लसीची मागणीही वाढली आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा चिंतेचा विषय बनला आहे. यूपी, बंगालसह अनेक राज्यांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध नाही. (हेही वाचा -COVID-19 Death in Mumbai: मुंबई मध्ये 78 दिवसांनंतर पुन्हा कोविड 19 ने दगावला रूग्ण; Comorbidities असल्याची रूग्णालयाची माहिती)
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत बोलताना सांगितले की, सरकार सतत त्यावर लक्ष ठेवून आहे आणि राज्यांना सल्लाही जारी करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार सातत्याने समोर येत आहेत, जे चिंताजनक आहेत. कोरोना विषाणूच्या प्रकार आणि उप-प्रकारांच्या प्रकरणांचा अभ्यास केला जात आहे.
मनसुख मांडविया यांनी पुढे म्हटलं आहे की, आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणांना धोकादायक म्हणता येणार नाही. तथापि, कोरोना प्रकरणांची वाढ पाहता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.