हिंसाचारानंतर उद्यापासून सुरु होतील JNU मधील वर्ग; विद्यापीठाने बजावली नोटीस
या उपद्रव्यांनी विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. जेएनयूमधील या हिंसक घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) 5 जानेवारी रोजी संध्याकाळी, काही मुखवटा घातलेले लोक हातात दांडे, रॉड घेऊन घुसले होते. या उपद्रव्यांनी विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. जेएनयूमधील या हिंसक घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते. त्यानंतर इथले वर्ग थांबविण्यात आले होते. आता 7 दिवसानंतर म्हणजे 13 जानेवारी रोजी, म्हणजे उद्यापासून विद्यापीठ प्रशासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ प्रशासनाने आपली अधिकृत माहिती केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला दिली आहे. तसेच जेएनयू प्रशासनाने शनिवारी या संदर्भातील विद्यार्थ्यांना नोटीस बजावली.
नोटीसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सोमवारपासून आपल्या वर्गात परतण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिसमध्ये दिल्लीबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांनाही परत येण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर जेएनयू विद्यार्थी संघटनेने नोंदणी प्रक्रियेवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आइशी घोष व इतर सर्व प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना हिवाळी सत्रावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी संघटित राहण्याचे आवाहन विद्यार्थी संघटनेने केले आहे. विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे की, लाईफ सायन्ससारख्या विषयावर संशोधन करणार्या केवळ 50-60 विद्यार्थ्यांनीच हिवाळी सत्रासाठी नोंदणी केली आहे. (हेही वाचा: JNU Attack: जेएनयू हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांची ओळख पटली; सरकारी सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांचा दावा)
दुसरीकडे कुलगुरू एम जगदीश कुमार यांनी वाढलेली फी मागे घ्यावी असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत विद्यार्थ्यांचा निषेध पाहून जेएनयू प्रशासनाने शनिवारी नोटीस बजावली. हिवाळी सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया योग्य दिशेने जात असल्याची माहिती प्रशासनाने नोटिशीद्वारे दिली. दरम्यान, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या हल्लेखोरांविरोधात सुमारे 11 तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत.