Blast In Jammu-Kashmir: PM मोदींच्या जम्मू दौऱ्याआधी Samba मध्ये स्फोट; पोलिसांनी नाकारली दहशतवादी कटाची शक्यता

वीज पडल्यामुळे किंवा उल्कापातामुळे हा स्फोट झाला असावा. मात्र, या हल्लाचा दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नाही”, असं स्पष्टीकरण पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Blast In Jammu-Kashmir (PC - ANI)

Blast In Jammu-Kashmir: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जम्मू (Jammu) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या सभेपूर्वी जम्मूतील सांबा (Samba) येथे स्फोट (Blast) झाला. या ठिकाणापासून 12 किमी अंतरावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका शेतात झाला. पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसरात शोध सुरू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पंचायती राज दिनानिमित्त मोदी आज येथे एका मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले. पंतप्रधान मोदी आज सांबा जिल्ह्यात होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. येथील पंचायत प्रतिनिधींशीही ते संवाद साधणार आहेत. (हेही वाचा - Mann Ki Baat 24 April 2022 Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' मध्ये काय दिला संदेश)

या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, “जम्मूच्या बिश्नाहमधील ललियाना गावातील एका शेतात हा संदिग्ध स्फोट झाला आहे. वीज पडल्यामुळे किंवा उल्कापातामुळे हा स्फोट झाला असावा. मात्र, या हल्लाचा दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नाही”, असं स्पष्टीकरण पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

दरम्यान, कुलगाममध्ये काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या रक्तरंजित चकमकीत लष्कराने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका पाकिस्तानीसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, दहशतवाद्यांकडून 2 रायफल, 7 मॅगझिन आणि 9 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.