BJP ची वेबसाईट हॅक; दिसू लागला नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर
Www.bjp.org या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना एरर 522 असा संदेश दिसत होता.
आज, मंगळवारी सकाळी भारतीय जनता पार्टी (BJP) ची वेबसाइट हॅक करण्यात आली. Www.bjp.org या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना एरर 522 असा संदेश दिसत होता. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मते, साइटच्या मुख्यपृष्ठावर आक्षेपार्ह शब्दातील मजकूर दिसत होता. आज सकाळी साधारण साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबतील अजूनतरी भाजप पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रक्रिया आलेली नाही. मात्र क्षणार्धात सोशल मिडियावर ही गोष्ट व्हायरल झाली आहे.
आज सकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलल अँजेला मर्केल यांचा एक व्हिडीओ साईटवर दिसत होता, सोबतच व्हिडीओच्यावर आक्षेपार्ह मजकूरही लिहिला होता. त्यावेळी ही वेबसाईट हॅक झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वेबसाईटवर, ‘आम्ही लवकरच परत येऊ! गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. यावेळी काही मेंटेनन्सचे काम चालू आहे, लवकरच ही वेबसाईट सुरु होईल- वेब प्रशासन.’ अशा आशयाचा मजकूर दिसू लागला. (हेही वाचा: पुलवामा हल्ल्यानंतर 90 भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मात्र सायबर हल्ला अयशस्वी)
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनीही याबाबत ट्वीट केले. ‘भाईयो और बहनों, जर तुम्ही आता भाजपची वेबसाईट पाहत नसाल तर तुम्ही बरंच काही मिस कराल.’ 1995 रोजी या वेबसाईटची नोंदणी झाली होती. मात्र भाजपची ही वेबसाईट 10 ऑक्टोबर, 2018 पासून अपडेटच झालेली नाही. दरम्यान, रविवारी, पाकिस्तानी सायबर हॅकर्सने 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्लाानंतर 90 हून अधिक भारतीय वेबसाइटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असे वृत्त होते. मात्र हे करणे शक्य झाले नाही.