Pulwama Terror Attack: 'भारत के वीर' पोर्टलवर 7 कोटी जमा; साई संस्थानकडून 2.51 कोटी रुपयांची मदत जाहीर
या पोर्टलवर गेल्या 36 तासांमध्ये तब्बल 7 कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. साईबाबा संस्थानकडून 2.51 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी के
14 फेब्रुवारीचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरला जाईल. या दिवशी झालेल्या हल्ल्यात तब्बल 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. एका क्षणात इतक्या लोकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. इतर कोणत्याही गोष्टींनी भरून न निघणारे नुकसान झाले आहे, म्हणूनच अनेक सामाजिक संस्था, सेलिब्रिटी, सामान्य नागरिक या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यास पुढे सरसावले आहेत. 'भारत के वीर' (Bharat Ke Veer) या पोर्टलवर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मदत मागवण्यात येत आहे. या पोर्टलवर गेल्या 36 तासांमध्ये तब्बल 7 कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी 'भारत के वीर' हेच पोर्टल अधिकृत असून इतर कोणत्याही मार्गाने पैसे पाठवू नयेत असे आवान केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर संस्थानदेखील सीआरपीएफच्या शहिद जवानांच्या परिवारासाठी आर्थिक मदत करणार आहे. साईबाबा संस्थानकडून 2.51 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली. याचसोबत बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक संस्थाननेदेखील 51 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
दरम्यान काल शहीद झालेल्या जवानांच्या घरी त्यांचे पार्थिव पाठवण्यात आले होते, त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विदर्भातील संजयसिंह दीक्षित राजपूत व नितीन राठोड हे दोन जवान दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यांच्यावर शनिवारी संध्याकाळी सरकारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याचवेळी राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या मदतीचे, 50 लाखाचे धनादेशही सुपूर्त करण्यात आले.