Bank Strike: आजपासून बँकांचा दोन दिवसांचा संप; कोणत्या सेवांवर होणार परिणाम? जाणून घ्या
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक अशा इतर खासगी बँकांच्या कामकाजावर संपाचा कोणताही परिणाम होणार नाही.
Bank Strike: सोमवारी आणि मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे लाखो कर्मचारी दोन दिवस संपावर असणार आहेत. दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि इतर अनेक मागण्यांच्या विरोधात बँक कर्मचारी संपावर जात आहेत. या संपात ग्रामीण बँकासुद्धा सहभागी होतील. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे 10 लाख कर्मचारी गेल्या महिन्यापासून केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत आणि आता या संघटनांकडून 15 आणि 16 मार्च रोजी दोन दिवसांचा संप जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारमुळे बँका बंद होत्या. अशात आता सोमवार आणि मंगळवारी बँकांनी संप पुकारल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
एटीएम-ऑनलाइन सेवांवर काय परिणाम होणार?
या संपामुळे शाखा, डिपॉझिट, चेक क्लीयरन्स, लोन क्लीयरन्स अशी सर्व कामे बंद पडतील. मात्र एटीएम सेवा सुरूच राहतील. त्याचवेळी संपाच्या वेळी ग्राहकांना ऑनलाईन सारख्या अन्य व्यवहाराचे पर्याय उपलब्ध असतील. (वाचा - Bank Strike: सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात 15 मार्चपासून बँकांचा 2 दिवसांचा संप; SBI सह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं कामकाज राहणार ठप्प)
15 आणि 16 मार्च रोजी शाखेत जाण्याऐवजी ग्राहक युपीआय पेमेंट सर्व्हिसेसद्वारे व्यवहार करू शकतात. आपण घरातून नेट बँकिंग सेवा देखील वापरू शकता. या संपाचा एटीएमवरही परिणाम होणार नाही. म्हणजेच आपल्याकडे अनेक प्रकारचे पर्याय आहेत. प्रत्येक बँकेचे स्वतःचे मोबाइल अॅप असते. या अॅपचा वापरदेखील तुम्ही करू शकता.
बँकांच्या संपाचे कारण -
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेव्यतिरिक्त आणखी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली. ज्याला बँक कर्मचारी संघटनांकडून विरोध होत आहे. आता या संघटनांनी निषेध म्हणून दोन दिवस संप पुकारला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात (2021-22) निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बँकांच्या खासगीकरणाव्यतिरिक्त पुढील आर्थिक वर्षात सर्वसाधारण विमा कंपनीचेही खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दरम्यान,काही बँकांनी संपामुळे त्यांचे कामकाज विस्कळीत होणार असल्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत. म्हणजेच ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. या संपामध्ये देशभरातील 10 लाखाहून अधिक कर्मचारी सहभागी होणार असल्याचे बँक संघटनांनी सांगितलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनीही आपल्या ग्राहकांना या संपाबाबत इशारा दिला आहे.
खासगी बँकांवर कोणताही परिणाम होणार नाही -
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक अशा इतर खासगी बँकांच्या कामकाजावर संपाचा कोणताही परिणाम होणार नाही.