IPL Auction 2025 Live

विधानसभा निवडणूक: ३ राज्यांमध्ये काँग्रेसपुढे कडवं आव्हान

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेस विजयाचे आव्हान कसे पेलते याकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(छायाचित्र सौजन्य: inc.in)

मुंबई: सन २०१८ची अखेर आणि सन २०१९ची सुरुवात भारतासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. २०१८च्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांकडे २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांसोबतच सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुका विचारात घेता दोन्ही पक्ष विधानसभेवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण, असे असले तरी, काँग्रेससाठी ही निवडणूक आत्मविश्वासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तर, भाजपसाठी प्रतिष्ठेची. कारण, काँग्रेसला २०१४ नंतर अनेक निवडणुकांत पराभव स्वीकारावा लागला आहे. मोदी-शहांच्या जोडीने महाराष्ट्र, हरियाणा, असम आणि उत्तराखंडसारख्या राज्यांतून काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता खेचली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेस विजयाचे आव्हान कसे पेलते याकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष?

राजस्थान: गेहलोत विरुद्ध पायलट संघर्ष?

राजस्थानच्या जनतेमध्ये मुख्यमंत्री वसूंधराराजे आणि पर्यायाने भाजपविरोधी चित्र सध्या तरी दिसते. मात्र, हे चित्र अधिक ठळक करत मोठ्या प्रमाणावर पडद्यावर आणण्यात काँग्रेस किती यशस्वी ठरते यावर सगळे गणित आवलंबून आहे. कारण, राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसमध्ये असलेला नेतृत्वाचा संघर्ष पक्षासाठी मारक तर, भाजपाठी फायदेशीर ठरू शकतो. अभ्यासकांच्या मते राजस्थानमध्ये काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष तीव्र आहे. त्यामुळे या दोघांमधला संघर्ष थोपवण्याचे महत्त्वपूर्ण काम पक्ष नेतृत्वाला करावे लागणार आहे. या दोन नेत्यांमध्ये वेळीचे समेट झाला तर, राजस्थानमध्ये काँग्रेससमोरचे आव्हान विजयात परावर्तीत होऊ शकते.

मध्यप्रदेशमध्येही पक्षांतर्गत गटबाजी

राजस्थानप्रमाणेच मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. येथेही पक्षनेतृत्वाने वेळीच लक्ष घालून डॅमेज कंट्रोल करणे गरजेचे आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेससमोर मुख्यमंत्रीपदासाठी तीन चेहरे आहेत. कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधीया आणि दिग्विजय सिंह या चेहऱ्यांची नावे. तिघांकडूनही राज्याचे नेतृत्व करण्याबाबतच्या महत्वाकांक्षा लपून राहिल्या नाहीत. पण, नेतृत्वासमोरचा पेच असा की, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर करायचे. निवडणुकीपूर्वी कोणाही एकाचे नाव जाहीर करायचे तर, दुसरे दोघे नाराज होणार आणि त्याचा पक्षाला मोठा फटका बसणार, याची नेतृत्वालाही कल्पना आहेच.

छत्तीसगढमध्ये अजित जोगींमुळे डोकेदुखी

छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल, सत्यनारायण शर्मा आणि टीएस सिंहदेव हे नेते काँग्रेसकडूनन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थानप्रमाणे इथेही पक्षांतर्गत कलह आहेच. पण, कधी काळी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि आता जनता काँग्रेस नावाने स्वत:चाच पक्ष काढलेले अजित जोगी हे काँग्रेससमोरचे मोठे आव्हान आहे. कारण, अजित जोगींचा पक्ष काँग्रेसची मते खाऊ शकतो. असे घडल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार हे उघड आहे. त्यामुळे हा तिढा नेतृत्व कसे सोडवते यावर बरेच काही अवलंबून आहे.