Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामिनास स्थगिती; आपच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मिळाला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावरुन राजधानी नवी दिल्लीत मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या आहेत. काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. ईडीने 48 तास मागितले होते, मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध केला. आज दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. (हेही वाचा - Delhi Court Grants Bail to Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा; दिल्ली न्यायालयाकडून दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर)
दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीस सुधीर कुमार जैन आणि रवींद्र दुडेजा यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अवघ्या 24 तासांच्या आत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दिल्ली सरकारच्या रद्द झालेल्या अबकारी धोरणातून मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अरविंद केजरीवाल आरोपी असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.
“उच्च न्यायालय या प्रकरणाची दखल घेईपर्यंत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी होईपर्यंत सत्र न्यायालयासमोर (राऊस एव्हेन्यू) आता या प्रकरणाची सुनावणी होणार नाही”, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. गुरुवारी सायंकाळी राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे न्यायाधीश न्याय बिंदू यांनी केजरीवाल यांचा जामीनाचा अर्ज मंजूर करत ईडीची ४८ तास थांबण्याची मागणी फेटाळून लावली होती.