Lok Sabha Winter Session: अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; विरोधकांवर घणाघाती टीका करत पंतप्रधान मोदींनी सांभाळली बाजू
बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यावरून आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. संसद भवन संकुलातही विरोधकांनी निदर्शने केली. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा बचाव केला.
Lok Sabha Winter Session: विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यावरून आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. संसद भवन संकुलातही विरोधकांनी निदर्शने केली. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा बचाव केला. आंबेडकरांचा अपमान काँग्रेस लपवू शकत नाही. काँग्रेसने आंबेडकरांच्या कार्याला नेहमीच कमी लेखले आहे आणि एससी-एसटी समुदायाचा अपमान केला आहे. निवडणुकीत त्यांचा एकदा नव्हे तर दोनदा पराभव झाला. पंडित नेहरूंनी आपल्या विरोधात प्रचार केला आणि आपल्या पराभवाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवले, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
काँग्रेस सत्तेत असताना बाबासाहेबांना भारतरत्न नाकारण्यात आला. बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले तेव्हाच बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. काँग्रेसने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या चित्राला स्थान देण्यास नकार दिला. आज आपण जे काही आहोत ते बाबा साहेब आंबेडकरांमुळेच आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या सरकारने गेल्या दशकभरापासून अथक प्रयत्न केले आहेत, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -'One Nation One Election' Bill: लोकसभेत मांडले गेले ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक; विरोधकांनी केला विरोध (Watch))
25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे असो, एससी/एसटी कायदा मजबूत करणे असो, स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना असे अनेक मोठे कार्यक्रम भाजपने आणले. या प्रत्येकाचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. या योजनांमुळे गरिबांना खूप मदत झाली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. (हेही वाचा: Parliament Winter Session: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा)
काय आहे नेमकं प्रकरण?
राज्यघटनेवर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. अमित शहा आपल्या भाषणादरम्यान डॉ.बी.आर.आंबेडकरांच्या वारशावर बोलत होते. अमित शहा म्हणाले की, 'आजकाल आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन बनली आहे. यासंदर्भात बोलताना अमित शहा म्हणाले, आता ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर... तुम्ही देवाची इतकी नावे घेतली असती तर सात जन्म स्वर्गात गेला असता.' अमित शहांच्या या विधानावर काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शहा यांच्या भाषणाबाबत एक लांबलचक पोस्ट शेअर करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.