Kumbh Mela 2020: कुंभमेळ्यातून दिल्लीला परतणाऱ्यांना 14 दिवस राहावं लागणार होम क्वारंटाईन; प्रशासनाने जारी केला आदेश

दिल्लीत सध्या सुमारे 70,000 सक्रिय प्रकरणे आहेत.

Shahi Snan at Kumbh Mela (Photo credits: Facebook/DY365)

Kumbh Mela 2020: कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत संक्रमित झालेल्यांचे प्रमाण दिल्लीत दररोज वाढत आहे. हरिद्वारच्या कुंभमेळ्यातून परतणाऱ्या दिल्लीवासीयांना क्वारंटाईन होणं बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही व्यक्तीस कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा आदेश शनिवारी दिल्ली प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, 4 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान कुंभमेळ्यात आलेल्या दिल्लीतील रहिवाशांना दिल्ली सरकारच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर 24 तासांच्या आत आपली माहिती अपलोड करावी लागेल. जे लोक 18 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कुंभ मेळ्यात जाणार आहेत, त्यांना दिल्ली सोडण्यापूर्वी त्यांचा तपशील भरावा लागेल. यामुळे सरकारला कुंभमेळ्यामध्ये सामील झालेल्यांची सर्व माहिती मिळू शकेल. (वाचा - गुजरातच्या जहांगीरपूर येथील मस्जिद आणि वडोदरामधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराचे कोव्हीड-19 रुग्णालयात रुपांतर)

कुंभमेळ्याला भेट देणारी कोणीही व्यक्ती आपली माहिती अपलोड करण्यात अपयशी ठरल्यास त्याला दोन आठवड्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनसाठी पाठविले जाईल. गेल्या पाच दिवसांत हरिद्वारमधील कुंभमेळ्यात 1,700 हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दिल्लीत मागील 24 तासांत 2437 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत सध्या सुमारे 70,000 सक्रिय प्रकरणे आहेत. तसेच शनिवारी देशात 2,34,692 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले.