Loudspeaker Row in UP: महाराष्ट्रानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी, जाणून घ्या काय आहे वाद

या बैठकीत त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य सर्वांनाच आहे, मात्र माईकचा आवाज कॅम्पसच्या बाहेर जाऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

Yogi Adityanath, Loudspeaker (PC - ANI)

Loudspeaker Row In UP: देशात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादाच्या (Loudspeaker Row) पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी सरकार (Yogi Government) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाऊडस्पीकरच्या वादामुळे यूपीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, अशा सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दिल्या आहेत. सीएम योगींनी पोलीस-प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत अक्षय्य तृतीया आणि ईद एकाच दिवशी असल्याने त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था कडेकोट ठेवण्यास सांगितले आहे.

सीएम योगी यांनी सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य सर्वांनाच आहे, मात्र माईकचा आवाज कॅम्पसच्या बाहेर जाऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. योगी म्हणाले, 'धार्मिक विचारधारेनुसार प्रत्येकाला त्याच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. लाऊडस्पीकरचा वापर करता येईल, पण आवाज आवारातून बाहेर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इतर लोकांची गैरसोय होऊ नये. याशिवाय नवीन ठिकाणी माईक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही,' असेही योगी यांनी स्पष्ट केल आहे. (हेही वाचा - Dilip Walse Patil on Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर गृहविभाग सतर्क, दिलीप वळसे पाटील म्हणाले 'आम्ही पूर्ण तयारीत')

महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय -

लाऊडस्पीकरच्या वादानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार आता महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकरचा वापर करण्यासाठी आता प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने एका आदेशात म्हटले आहे.

काय आहे वाद ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. वास्तविक, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, राज्य सरकारने 3 मे पर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवावेत. तसे न केल्यास मनसे कार्यकर्ते मशिदीबाहेर स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील. या मुद्द्यावर आपण मागे हटणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांनी देशभरातील हिंदूंना तयार राहण्याचे आवाहनही केले आहे.