Minor Boy Casting Vote Video: अल्पवयीन मुलाला मतदान करायला लावल्याने भाजप नेत्यावर गुन्हा दाखल, तीन अधिकारी निलंबित
ही घटना मंगळावरी भोपाळ येथील बेरासिया येथील लोकसभा मतदान केंद्रावर घडली आहे.
Minor Boy Casting Vote Video: भाजपच्या एका बड्या नेत्याने मतदान केंद्रात आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान करु दिल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ही घटना मंगळावरी भोपाळ येथील बेरासिया येथील लोकसभा मतदान केंद्रावर घडली आहे. एवढंच नव्हे तर भाजप नेत्याने अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. (हेही वाचा- 'नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा)
मिळालेल्या माहितीनुसार, विनय मेहर असं गुन्हा दाखल झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. त्यांच्या या कृत्यामुळे केवळ त्याच्याविरुध्द एफआयआरच नाही तर मतदान केंद्रावरील पीठासीन अधिकारी आणि त्याच्या तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची दखल घेत भोपाळचे जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
मेहर यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडिओत त्याचा मुलगा वडिलांच्या वतीने ईव्हीएमचे बदन दाबताना दिसत आहे. अल्पवयीन मुलगा मतदान करत असल्याचे व्हिडिओत दिसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. तात्काळ मेहर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर आरओ कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी सांगितले की, भाजप नेते विनय मेहर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तर बूथ क्रमांक ७१ खितवास पीठासीन अधिकारी संदीप सैनी आणि अधीनस्थ सीआर बाथम, मनोज कुमार मौर्य आणि मदन गोपाल पटेल यांना निलंबित करण्यात आले आहे.