5 States Assembly Election 2021 Dates: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये 6 एप्रिल ला मतदान, 2 मे रोजी होणार मतमोजणी; 5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांसाठी मतदान

5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांसाठी मतदान होणार आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथील 2.7 लाख मतदान केंद्रांवर 18.68 कोटी मतदार मतदान करतील.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा (PC - ANI)

5 States Assembly Election 2021 Dates: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसामसह पाच राज्यात निवडणुका जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी या पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील. आसाममध्ये तीन आणि केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एक टप्प्यात निवडणुका होणार आहेत. आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च, दुसर्‍या टप्प्यातील मतदान 1 एप्रिल आणि तिसर्‍या टप्प्यातील मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे. केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी मध्ये 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सर्व राज्यांमधील मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता पाच राज्यातील निवडणुका घेतल्या जातील. 5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांसाठी मतदान होणार आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथील 2.7 लाख मतदान केंद्रांवर 18.68 कोटी मतदार मतदान करतील. कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात येईल, असंही सुनील अरोरा यांनी सांगितलं आहे. मतदानाच्या वेळी पुरेसे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) तैनात करण्यात येणार आहे. सर्व महत्वाच्या, संवेदनशील मतदान केंद्रावर सीएपीएफ दलाची पुरेशी संख्या तैनात केली जाणार असल्याचंही निवडणुक आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 21,498 निवडणूक केंद्रे होती. आता निवडणूक केंद्रांची संख्या 40,771 असेल. पश्चिम बंगाल मध्ये 2016 मध्ये 77,413 निवडणुक केंद्र होते. आता ही संख्या 1,01,916 इतकी असेल. 2016 मध्ये आसामध्ये 24,890 निवडणुक केंद्र होते. आता राज्यात 33,530 निवडणुक केंद्र असतील. तामिळनाडुमध्ये 2016 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 66,007 निवडणुक केंद्र होते. आता ही संख्या 88,936 इतकी असेल.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं की, निवडणुकीच्या काळात उमेदवारांना नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. पाच लोकांना घरोघरी प्रचार करायला परवानगी देण्यात येईल. नामनिर्देशन आणि सिक्योरिटी मनी संदर्भातील प्रक्रिया देखील ऑनलाइन सादर केली जाईल. रॅलीचे मैदान निश्चित केले जाईल. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये निवडणुका जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू होईल.