Tigers Deaths in 2 Months: भारतात अवघ्या दोन महिन्यांत 30 वाघांचा मृत्यू; एनटीसीए अधिकारी म्हणाले, वाघांच्या मृत्यूची ही संख्या कोणत्याही संकटाचा इशारा नाही
या 30 वाघांपैकी 16 वाघांच्या मृत्यूची नोंद राखीव क्षेत्राबाहेर झाली आहे.
Tigers Deaths in 2 Months: या वर्षाच्या सुरुवातीच्या सुमारे दोन महिन्यांत भारतात 30 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वाघांच्या मृत्यूची ही संख्या कोणत्याही संकटाची चेतावणी देण्याचे कारण नाही. कारण, साधारणपणे जानेवारी ते मार्च दरम्यान वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. आतापर्यंत कान्हा, पन्ना, रणथंबोर, पेंच, कॉर्बेट, सातपुडा, ओरंग, काझीरंगा आणि सत्यमंगलम अभयारण्यात वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या 30 वाघांपैकी 16 वाघांच्या मृत्यूची नोंद राखीव क्षेत्राबाहेर झाली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आतापर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक 9 वाघांचा मृत्यू झाला आहे, तर महाराष्ट्रात 7 वाघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या वाघांमध्ये एका लहान शावकाचाही समावेश आहे. (हेही वाचा - Tiger Viral Video: वर्धेत भररस्त्यावर जंगल सफारीचा थरार, रोडवर पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार)
एनटीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचे कारण म्हणजे वाघांची संख्या जास्त आहे. यावर्षी मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येबाबत चिंता करण्यासारखे काही नाही. वाघांची लोकसंख्या वाढल्याने नैसर्गिकरित्या मरणाऱ्या वाघांची संख्याही वाढणार आहे.
एनटीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आकडेवारीवरून असे दिसून येते की, जानेवारी ते मार्च या कालावधीत वाघांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या होते. प्रदेशावरून वाघांमध्ये संघर्षही होतात. देशात वाघांची चांगली संख्या असताना दरवर्षी 200 वाघांचा मृत्यू होणे ही काही असामान्य गोष्ट नाही. देशातील वाघांची संख्या वार्षिक सहा टक्क्यांनी वाढत आहे. वाघांच्या मृत्यूचे प्रमाण संदर्भाबाहेर काढणे चूक आहे. वाघांची संख्याही वाढत आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. वाघाचे सरासरी आयुष्य फक्त 12 वर्षे असते.