Kinnaur Collapse: हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये कोसळली दरड, अपघातात 11 जणांचा मृत्यू तर अद्यापही अनेकांचा शोध सुरू
त्याच वेळी इतर 13 जणांना वाचवण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) किन्नौर (Kinnaur) जिल्ह्यात काल एका बस आणि इतर वाहनांवर दरड कोसळल्याने (collapse) आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी इतर 13 जणांना वाचवण्यात आले आहे. तर सुमारे 50 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भूस्खलनाचा (Landslide) एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात असे दिसून आले की प्रथम डोंगरावरील दगड खाली नदीत पडले. त्यानंतर पर्वताचा मोठा भाग राष्ट्रीय महामार्ग 5 वर आणि नदीत पडतो. राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी आठ जण टाटा सुमो टॅक्सीमध्ये अडकलेले आढळले.
मोक्तांनी सांगितले की हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (HRTC) ची बस, जी रेकॉंग पीओहून हरिद्वारमार्गे शिमलाकडे जात होती. ती अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की मृतांची संख्या आणखी वाढू शकते. कारण आणखी एक HRTC बस आणि बोलेरो आणि त्यातील प्रवासी ढिगाऱ्याखाली सापडले नाहीत आणि त्यांचा अद्याप शोध लागला नाही. ते म्हणाले की दोन्ही वाहने भंगारसह खाली लोटली जाण्याची शक्यता आहे. मोक्तांनी असेही सांगितले की टाटा सुमो सापडली ज्यामध्ये आठ लोक मृत अवस्थेत आढळले. ते म्हणाले की दगड पडल्यामुळे नदीचा काठ ट्रकवर गेला आणि चालकाचा मृतदेह सापडला आहे. पूर्णपणे खराब झालेली अल्टो कारही जप्त करण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की कारच्या आत कोणीही सापडले नाही.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफला नूरपूरहून पाचारण केले आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक पोलीस, होमगार्ड, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि वैद्यकीय पथकांसह शोध आणि बचाव पथके घटनास्थळी आहेत. असे त्यांनी सांगितले. दहा रुग्णवाहिका, चार अर्थ मूव्हर्स, ITBP च्या 17 व्या बटालियनचे 52 जवान, 30 पोलीस कर्मचारी आणि 27 NDRF जवान बचाव कार्यात सहभागी आहेत.