Rajastan Shocker: दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, उदयपूरमध्ये जातीय तणाव वाढल्याने 24 तास इंटरनेट बंद

या घटनेनंतर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला. जमावाने शॉपिंग मॉलची तोडफोड केली. रस्त्यावर दगडफेक केली. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या गाड्याही जाळण्यात आल्या.

Photo Credit -X

Rajastan Shocker: राजस्थानमधील उदयपूर येथील मधूबन भागात एका सरकारी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने वार केला. या घटनेनंतर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला. जमावाने शॉपिंग मॉलची तोडफोड केली. रस्त्यावर दगडफेक केली. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या गाड्याही जाळण्यात आल्या. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तसेच शहरात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्याचे आदेश लागू करण्यात आले आहे. (हेही वाचा- जलेबी आणि कचोरी न दिल्याने विद्यार्थ्यी संतापले, शिक्षकाला पळवून पळवून मारले, बिहार येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, मधूबन येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय भाटीयानी चौहट्टा येथे एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी विद्यार्थ्याला तातडीने महाराणा भूपाल एमबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीवर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्याने चाकून हल्ला का केला याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

विद्यार्थ्यावर हल्ला झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे जातिय तेढ निर्माण झाली आहे. तणाव वाढल्याने बापूबाजार, हातीपोळ, घंटा घर, चेतक सर्कल व परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आले आहे. शहरात कलम १४४ सह प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने आज रात्री १० वाजल्यापासून पुढील २४ तास इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.

हल्ला केलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या वडिलांना अटक करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये कश्यावरून वाद झाला हे अद्याप समोर आले नाही.