धक्कादायक! 2018 मध्ये प्रतिदिन सरासरी 109 बालकांचे लैंगिक शोषण; अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) (National Crime Record Bureau) सादर केलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये प्रत्येक दिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे.
भारतातमध्ये बालकांवरील लैंगिक अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) (National Crime Record Bureau) सादर केलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये प्रत्येक दिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण (Children Sexually Abused) करण्यात आले. 2017 च्या तुलनेत अशा घटनांमध्ये 22 टक्क्यांनी वढ झाली आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये अशा 39 हजार 827 घटना घडल्या. तर 2017 मध्ये 32 हजार 608 घटनांची नोंद करण्यात आली होती. याबाबत 'फ्री प्रेस जर्नल'ने वृत्त प्रकाशित केले आहे.
हैदराबादमध्ये डॉ. प्रियंका रेड्डीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते. चाइल्ड राइट्स एंड यू (Child Rights and You) म्हणजेच क्रायच्या संचालक प्रीती महरा यांनी या आकडेवारीनंतर आपली प्रतिक्रिया दिली. बालकांवरील लैंगिक अत्याचारात वाढ होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तसेच अशा घटनांबाबत तक्रारी नोंदविण्याची वाढती प्रवृत्ती बघता लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचे दिसते, असेही प्रीती महरा यांनी स्पष्ट केलं. 2018 मध्ये अल्पवयीन बालकांचे अपहरण करण्यांच्या गुन्ह्यांचे प्रमाण 44.2 टक्के होते. तसेच यात पोस्कोअंतर्गत (Protection of Children from Sexual Offences Act) (POCSO) येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण 34.7 टक्के होते. (हेही वाचा - मुंबई: 10 वर्षीय मुलीवर नराधमाकडून बलात्कार, विद्याविहार स्थानकात मृतावस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ)
देशभरात अल्पवयीन बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासंबंधित गुन्ह्यांच्या राज्यनिहाय आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार आघाडीवर आहे. अश्लील साहित्य चित्रासाठी बालकांचा वापर करणे तसेच बालकांशी संबंधित अश्लील साहित्य-चित्रे संग्रहित करण्यासंबंधित 781 घटना घडल्या. या प्रकारच्या घटनांमध्ये 2017 च्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये देशभरात बालकांवर 21 हजार 605 घटना घडल्या. यात 21 हजार 401 बालिका आणि 204 बालकांचा समावेश होता. अल्पवयीन बालकांवर बलात्कार करणाऱ्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या असून यात 28 हजार 832 घटना घडल्या. 2008 ते 2018 या 10 वर्षांत बालकांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण 6 पटीने वाढले आहे.