Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतील 'टप्पू' उर्फ Bhavya Gandhi याच्या वडीलांचं कोरोनामुळे निधन

काही दिवसांपूर्वी भव्यच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली होती.

Bhavya Gandhi Father passed away due to Covid-19 (Photo Credits: Facebook)

तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma) मालिकेत 'टप्पू' ची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधी (Bhavya Gandhi) याच्या वडीलाचं कोविड-19 (Covid-19) मुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी भव्यच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) उपचार सुरु होते. मात्र प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर 11 मे रोजी उपचारादरम्यान त्यांनी अखरेचा श्वास घेतला.

विनोदी गांधी असं भव्यच्या वडीलाचं नाव असून ते बांधकाम व्यावसायिक होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा आणि त्यांची दोन मुलं निश्चित आणि भव्य असा परिवार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97)

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत भव्य गांधी याने तब्बल 9 वर्ष काम केलं. त्याने साकारलेली तिपेंद्र उर्फ टप्पू या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं.  2017 मध्ये त्याने मालिका सोडली असली तरी तो मालिकेतील कलाकारांच्या संपर्कात असल्याचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दिसून येतं. काही दिवसांपूर्वी गोगीची भूमिका साकरणारा अभिनेता समय शाह याच्या बहिणीची विवाहसोहळ्याला त्याने वडील आजारी असल्यामुळे व्हिडिओ कॉलिंगद्वारे हजेरी लावली होती. मालिका सोडल्यानंतर त्याने काही गुजराती सिनेमातही काम केलं आहे.

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असून याचा विळखा मनोरंजन विश्वाला बसला आहे. अनेक कलाकारांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे.