'त्या' वादग्रस्त व्हिडिओबाबत ISKON ने दाखल केली तक्रार; Shemaroo ने माफी मागत तोडले सुरलीन कौर व बलराज स्याल यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध
धार्मिक संस्था इस्कॉन (ISKON) ने मुंबईतील महिला स्टँडअप कॉमेडियन सुरलीन कौर ग्रोवर (Surleen Kaur) आणि एंटरटेनमेंट कंपनी शेमारू (Shemaroo) यांच्याविरोधात, एका वादग्रस्त व्हिडिओवरून तक्रार दाखल केली आहे.
धार्मिक संस्था इस्कॉन (ISKON) ने मुंबईतील महिला स्टँडअप कॉमेडियन सुरलीन कौर ग्रोवर (Surleen Kaur) आणि एंटरटेनमेंट कंपनी शेमारू (Shemaroo) यांच्याविरोधात, एका वादग्रस्त व्हिडिओवरून तक्रार दाखल केली आहे. आरोपी कॉमेडियनवर, त्या व्हिडिओमध्ये इस्कॉन, साधू-संत आणि हिंदू धर्माविरूद्ध अपमानास्पद टिप्पण्या केल्याचा आरोप आहे. बघता बघता हे प्रकरणच फारच वाढले व त्यानंतर आता शेमारूला लोकांच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. शेमारूने या प्रकरणाबाबत माफीही मागितली होती. मात्र आता सुरलीन कौर ग्रोवर आणि श्री. बलराज स्याल (Balraj Syal) यांच्यासोबतचे सर्व व्यावसायिक संबंध तोडण्यात येत आहेत, असेही शेमारूने जाहीर केले आहे.
इस्कॉनने ज्या व्हिडिओबद्दल आपत्ती दर्शवली आहे, त्या व्हिडिओमध्ये सुरलिन म्हणत आहे की, 'अर्थातच आपण सगळे इस्कॉनवाले आहोत पण आतून आपण अश्लील आहोत.' याशिवाय ती पुढे म्हणते, 'धन्य आहेत आमचे ऋषी-मुनी ज्यांनी थोडी संस्कृत वापरून आपले मोह मोठे घोटाळे लपवले, ते म्हणजे... कामसूत्र.' अशा वादग्रस्त गोष्टींबाबत इस्कॉनने दिलेल्या तक्रारपत्रात, इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी या व्हिडिओचा उल्लेख केला आहे.
इस्कॉनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, व्हिडिओमध्ये कौरने वापरलेली भाषा केवळ अत्यंत आक्षेपार्हच नाही, तर अत्यंत अपमानकारक आहे आणि यामुळे सनातन धर्माचे अनुयायी, हिंदू आणि जगभरातील इस्कॉनशी संबंधित लोकांची मने दुखावली आहेत. (हेही वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी ची पत्नी आलिया हिने घटस्फोटासह पोटगी म्हणून 30 कोटी रुपये आणि 4BHK फ्लॅटची केली मागणी?)
या व्हिडिओमुळे झालेल्या वादानंतर, शेमारूने ट्विट करत घडलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हटले आहे. यासह त्यांनी माफी मागत, या व्हिडिओशी निगडीत दोन व्यक्ती, सुरलीन कौन आणि बलराज स्याल यांच्याशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत असे सांगितले आहे. मात्र इस्कॉन आपल्या तक्रारीवर ठाम आहे. राधारमण दास यांनी शेमारूची माफी आम्ही स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे. याबाबत शेमारू व सुरलीन कौन यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.