‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची टिंगल उडवणाऱ्या लोकांवर भडकले गिरीश ओक; म्हणाले- ‘तुमच्यासाठी जीवावर उदार होऊन शुटींगला जातो’, झाले ट्रोल (Watch Replies)
आभाळमाया, प्रपंच, एक धागा सुखाचा, या सुखांनो या, असंभव, वादळवाट अशा अनेक उत्तमोत्तम कलाकृती झी मराठीने प्रेक्षकांच्या समोर मांडल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून झी मराठीच्या मालिकांचा दर्जा प्रचंड घसरल्याची तक्रार आणि चर्चा नेहमीच सोशल मिडियावर रंगताना दिसत आहे.
एकेकाळी मराठी भाषेत दर्जेदार मालिकांची निर्मिती करणारी वाहिनी म्हणून झी मराठी (Zee Marathi) कडे पहिले जात होते. आभाळमाया, प्रपंच, एक धागा सुखाचा, या सुखांनो या, असंभव, वादळवाट अशा अनेक उत्तमोत्तम कलाकृती झी मराठीने प्रेक्षकांच्या समोर मांडल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून झी मराठीच्या मालिकांचा दर्जा प्रचंड घसरल्याची तक्रार आणि चर्चा नेहमीच सोशल मिडियावर रंगताना दिसत आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, या मालिकेबद्दल या आधी अनेक मीम्स, जोक्स व्हायरल झाले होते. आता नेटऱ्यांच्या निशाण्यावर आहे ती, ‘अग्गंबाई सासूबाई’ (Agga Bai Sasubai) ही मालिका. या मालिकेची टिंगल उडवणाऱ्या काही सोशल मिडिया वापरकर्त्यांना अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांनी उत्तर दिले. मात्र या उत्तरामुळे गिरीश ओक चांगलेच ट्रोल झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर सुरु झाली. तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ-जोशी, गिरीश ओक, रवी पर्वर्धन अशी तगडी स्टार कास्ट असल्याने या मालिकेला अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. मात्र कालांतराने ही मालिका सोशल मिडियावर टिंगल-टवाळीचे साधन बनली. या मालिकेतील ‘बबड्या’ या पात्राबद्दल तर अनेक जोक्स व्हायरल झाले आहेत. या मालिकेतील निवेदिता यांच्या आसावरी या व्यक्तिरेखेबद्दलही लोक थट्टा करू लागले आहेत.
अशात निशा सोनटक्के यांनी सोशल मिडियावर या मालिकेविषयी एक भन्नाट पोस्ट केली होती. या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की स्वतः गिरीश ओक यांनीही इथे कमेंट लिहिली. ते म्हणतात, ‘तुमचा वेळ मजेत जातोय नं ? मग झालं तर. वर पार्टी, राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्तच होतंय. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत काहीही (बुध्दीही) खर्च न करता वेळ मजेत जातोय तुमचा. तुमच्या ह्या मनोरंजनाच्या खाद्याकरता आम्हाला जिवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय.’
गिरीश ओक यांच्या या कमेंटनंतर ते भलतेच ट्रोल झाले आहेत. अनेकांनी ‘शुटींगला जावू नका व ही मालिका बंद करा,’ असा सल्ला दिला आहे. तर एक जण म्हणतो, ‘तुम्ही एक डॉक्टर आहात न मग आत्ताच्या कोरोनाच्या परीस्थितीत तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्णसेवा करायला पाहिजे.’ तर अजून एक जण लिहितो, ‘खर्च करून करून संपली असेल बुद्धी तर कुठे उधार मिळते का बघा पण बिना बुद्धीचे एपिसोड टाकू नका हो.’ (हेही वाचा: 65 वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांसाठी चित्रपट, मालिका निर्मात्यांची कोर्टात धाव; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल)
अशा प्रकारे लोकांनी दाखवून दिले आहे की, सध्याच्या नेतफ्लिक्स, हॉटस्टारच्या युगात झी मराठीच्या टुकार मालिका एका वेगळ्याच अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.
दरम्यान, याधीही झी मराठीच्या मालिका कैकवेळा ट्रोल झाल्या आहेत. ‘होणार सून मी...’ मधील जान्हवीचे बाळंतपण असो वा ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील राणाचे पात्र असो. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे मीम्स बनवून आता ती मालिका चोथा झाली आहे. तरी झी मराठी आपल्या मालिकांचा दर्जा सुधारायचे नाव घेत नाही.