सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका Bhakharwadi च्या स्टाफ मेंबरचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू; सेटवरील 8 जणांना कोरोनाची लागण- रिपोर्ट्स
मात्र शुटींगच्या सेटवरही कोरोनाचे थैमान सुरूच असल्याच्या अनेक बातम्या येत आहे.
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मध्ये शिथिलता देऊन, सध्या चित्रपट व मालिकांचे शूट करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शुटींगच्या सेटवरही कोरोनाचे थैमान सुरूच असल्याच्या अनेक बातम्या येत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, सब टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका ‘बाकरवडी’ (Bhakharwadi) च्या एका स्टाफ मेंबरचा कोरोना मुळे मृत्त्यू झाला आहे. त्यानंतर सेटवरील इतर सदस्यांची कोरोना विषाणूची चाचणी केली असता, तब्बल 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार 26 जुलैपासून तीन दिवस शूटिंग थांबविण्यात आले होते आणि संपूर्ण कास्ट आणि क्रू यांची कोरोना चाचणी घेण्यात आली.
याबाबत निर्माते जेडी मजेठिया (JD Majethia) यांनी सांगितले, ‘अब्दुल नावाची व्यक्ती सेटवर टेलर म्हणून काम करत होती. 11 जुलै रोजी अब्दुल यांनी थकवा जाणवत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही औषधे दिली. 12 जुलै रोजी त्यांनी सेटवर काम केले व 13 जुलै रोजी घरी जाण्यासाठी सुट्टी मागितली. त्यानंतर अब्दुल घरी गेल्यावर त्यांच्याकडून काहीच संपर्क झाला नाही. या दरम्यान प्रोडक्शन हाऊसकडून त्यांना अनेकवेळा कॉल करण्यात आले होते. पुढे 20 जुलै रोजी अब्दुल यांची कोरोनाची चाचणी झाली व 21 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.’
त्यानंतर ताबडतोब इतर 70 सदस्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये कलाकार, तंत्रज्ञ, कामगार, घरी असलेले पर्यायी कलाकार, सेटवर त्या दिवशी उपस्थित असलेले कलाकार, ड्रायव्हर्स, स्टुडिओ कर्मचारी ई. समावेश होता. यामध्ये सोमवारी आलेल्या रिपोर्टनुसार आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. या सर्वांना आता आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचारही सुरू झाले आहेत. बाकरवडी सीरियलचे निर्माता जेडी मजीठिया हे इंडियन फिल्म एंड टेलीविजन प्रोड्यूसर्सचे उपाध्यक्ष देखील आहेत. याआधी त्यांनीबा बहू और बेबी, खिचडी, साराभाई vs साराभाई अशा अनेक हिट शोजची निर्मिती केली आहे.