Chef Pooja Dhingra करणार MasterChef India च्या नव्या सीझन मध्ये Ranveer Brar, Vikas Khanna सोबत परीक्षण
पूजाने नुकताच शो च्या शूटिंग दरम्यानचे धम्माल क्षण इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.
मास्टरशेफ इंडिया (MasterChef India) च्या नव्या सीझनची तयारी आता सुरू झाली आहे. कुकिंग रिअॅलिटी शो मध्ये 'मास्टरशेफ इंडिया' हा रसिकांच्या मनात विशेष स्थान असलेला एक लोकप्रिय रिएलिटी शो आहे. या शो मध्ये यंदा परीक्षकांच्या भूमिकेमध्ये शेफ विकास खन्ना आणि शेफ रणवीर ब्रार यांच्यासोबत शेफ पूजा धिंग्रा ( Chef Pooja Dhingra) देखील दिसणार आहे. यापूर्वीच्या सीझनमध्ये गेस्ट जज असणारी पूजा आता सीझन भर रणवीर आणि विकास यांच्यासोबत दिसेल. पूजाने नुकताच शो च्या शूटिंग दरम्यानचे धम्माल क्षण इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.
“मास्टरशेफ इंडिया हे होम शेफसाठी एक अतुलनीय व्यासपीठ आहे. स्वयंपाकातील दिग्गज शेफ विकास खन्ना आणि शेफ रणवीर ब्रार यांच्यासोबत मास्टरशेफ इंडियाच्या जजिंग पॅनेलमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. या कार्यक्रमात जज म्हणून सामील होण्याची आणि शेफ विकास आणि शेफ रणवीर यांसारख्या उल्लेखनीय मार्गदर्शकांसोबत मला काम करायची संधी मिळाली आहे यासाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. आम्ही एकत्रितपणे नाविन्यपूर्णतेला प्रेरणा देण्याचे आणि पाककला मास्टर्सच्या पुढील पिढीचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठेवून जजिंग करू. मास्टरशेफ इंडिया या कार्यक्रमाची प्रेक्षकांइतकीच आम्हाला देखील उत्सुकता आहे.” अशी भावना पूजा ने बोलून दाखवली आहे.
मास्टरशेफ इंडियाचे जज म्हणून पूजा धिंग्रा लाडके सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांच्यासोबत काम करणार आहे. एकत्रितपणे, ते समर्पित स्पर्धकांना मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देतील. मास्टरशेफ इंडिया लवकरच फक्त सोनी लिव्हवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.