Ashok Shinde Tests Positive COVID-19: मराठी अभिनेते अशोक शिंदे यांना कोरोनाची लागण, स्वत:ला केले होम क्वारंटाईन
मला कोरोनाची लागण झाली असून मी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोरोना आतापर्यंत बॉलिवूडमधील कलाकारांसह अनेक मराठी कलाकारांना देखील आपल्या जाळ्यात ओढले आहे. काही दिवसांपूर्वी मराठी सुप्रसिद्ध जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता मराठी अभिनेते अशोक शिंदे (Ashok Shinde) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मिडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून मी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अशोक शिंदे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी "मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो, सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतरही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि माझे औषधोपचार सुरु केले आहेत" असे म्हटले आहे.हेदेखील वाचा- 'येऊ कशी तशी मी नांंदायला' सह अनेक मराठी मालिका पुढील चित्रीकरणाच्या शूट साठी गोवा, सिल्वासा मध्ये दाखल; कलाकारांनी शेअर केले BTS, पहा फोटोज
त्याचबरोबर "मी सर्वांना विनंती करतो, की गेल्या 15 दिवसांत जे माझ्या संपर्कात आले त्यांनी कृपया स्वत:ची चाचणी करुन घ्या. काळजी घ्या सुरक्षित राहा" असा सल्ला देखील त्यांनी दिली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या असून लवकरात लवकर बरे व्हा. काळजी घ्या अशा कमेंट्स त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
अशोक शिंदे सध्या स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान' या मालिकेत काम करत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे सध्या या मालिकेची स्टारकास्ट सिल्व्हासाला शूटिंगसाठी गेले आहेत. या मालिकेसह अनेक मालिकांची टीम चित्रिकरणासाठी राज्याबाहेर गेले आहेत.
लोकसत्ताच्या वृत्तानुसार, 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'रंग माझा वेगळा' या मालिकेत पुढील भागांचं चित्रीकरण गोव्यात होणार आहे तर 'सांग तू आहेस का','मुलगी झाली हो','सहकुटुंब सहपरिवार','स्वाभिमान','आई कुठे काय करते' या मालिकेत पुढील भागांचं चित्रीकरण सिल्वासामध्ये करणार आहेत.