आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम 'नवे लक्ष्य' या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात करणार पदार्पण
सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.
होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम (Soham) देखील आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. वडिल आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि आई सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांच्या पावलावर पाऊल ठेवून छोट्या पडद्यावरून मनोरंजन क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरु होणारी 'नवे लक्ष्य' (Nave Lakshya) या मालिकेतून सोहम आपल्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे निर्माते स्वत: आदेश बांदेकर आहेत. त्यामुळे आपल्या मालिकेतूनच ते आपल्या मुलाला लाँच करत आहेत.
येत्या 7 मार्चपासून 'नवे लक्ष्य' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार आहे. सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- अभिनेत्री Varsha Usgaonkar १० वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर; मालिकेत दिसणार सासूच्या भूमिकेत
सोहमसह अनेक मराठी स्टार किड्सने मालिका आणि चित्रपटांतून मराठी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यात आता सोहमची भर पडणार आहे. काही वर्षांपूर्वी आदेश सोहम प्रोडक्शन निर्मात 'लक्ष्य' मालिका स्टार प्रवाहवर आली होती. त्या मालिकेच्या धर्तीवरच महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध 'नवे लक्ष्य' मालिकेतून घेण्यात आला आहे.
सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी छोट्या पडद्यावरुन सुरुवात करुन प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती करण्यापर्यंतचा पल्ला गाठला आहे. यात सुचित्रा बांदेकर यांची 'हम पांच' मधील भूमिका आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. तर दुसरीकडे होम मिनिस्टर सारखा दमदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आदेश बांदेकर आदेश भावोजी म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून सोहम देखील छोट्या पडद्याच्या माध्यमातून आपली जादू पसरवतो हे येत्या काही दिवसांतच कळेल.