Swarajyarakshak Sambhaji Written Update : अखेर राजद्रोहाच्या निवाड्यात सत्य बाहेर आले; अनाजीपंतांनी अपराधी म्हणून घेतले सोयराबाईंचे नाव

अगदी शेवटच्या घटकेला आपला मूळ रंग दाखवता, आपल्याला जर वाचायचे असेल तर सोयराबाईसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलेले असते, त्यामुळे आदेश देणाराही गुन्हेगार असे सांगून अनाजी पंत सोयराबाईंनीच हे सगळे घडवून आणले असल्याचे सांगतात.

स्वराज्यरक्षक संभाजी (Photo credit : Zee5)

Swarajyarakshak Sambhaji Episode 17 जानेवारी, 2019 : परवाच्या (16 जानेवारी) भागात, 'चुकीला माफी नाही' असे म्हणत जनार्दनपंतांना डोळे फोडून वासोट्याच्या किल्ल्यावर पाठवण्यात येण्याची शिक्षा झाली. हे पाहून इतर कारभाऱ्यांना धडकीच भरली, शेवटी शंभूमहाराजांनी आपल्याला  अभय द्यावे म्हणून रावजी आणि हिरोजी फर्जंद कबुलीजबाब देण्यास तयार होतात. स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji) च्या कालच्या (17 जानेवारी) भागाची सुरुवात ही सदरेपासून होते, जिथे रावजी आणि हिरोजी फर्जंद माफी मागत आहेत. घाबरलेल्या आवजींच्या तोंडून पटापट घडलेला घटनाक्रम बाहेर पडतो. ‘महाराजांच्या आजारासमोर जेव्हा वैद्यांनी हात टेकले तेव्हा गडाचे दरवाजे बंद करून तातडीने पेशवे मोरोपंत, अनाजी यांना खलिते पाठवून बोलावून घेतले. महाराजांच्या अग्निसंस्कारानंतर राजाराम महाराजांच्या मंचकारोहणासाठी गडाचे दरवाजे उघडले नाहीत. पन्हाळ्यावर जनार्दन पंत हे सर्वकाही जाणत होते मात्र मुद्दाम याची शंभूराजेंना खबर लागू दिली नाही. हे सर्व घडले ते अनाजीपंत यांच्या सांगण्यावरून.' असा कबुलीजबाब पार पडल्यावर,  हिरोजी फर्जंदही 'अनाजी पंतांनी मनात विष कालवल्याने आपण त्यांची साथ दिली.’ असे सांगतात.

Swarajyarakshak Sambhaji - सदरेवर आरोपी म्हणून उभे असलेले कारभारी (Photo credit : Zee5)

या दोघांनी गुन्हे कबूल केल्यानंतर आता पेशव्यांची पाळी, ‘जे काही घडत होते त्याला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केला मात्र आम्हाला जेरेबंद करण्याची, आमच्या घरावर चौकीपहारे बसवले जाण्याची धमकी दिल्यानंतर आमचा नाईलाज झाला.’ जे काही घडले त्याची इत्यंभूत माहिती दिल्यानंतर रोजच्या अपमानाने घायाळ झालेले पेशवे खाली पडतात. ‘महाराजांच्या जाण्यानंतर आम्ही हे करायला नको होते, आम्हाला तोफेच्या तोंडी द्या’ अशी आळवणी करतात. मात्र विवेकी, स्वराज्य रक्षक शंभूराजे (Swarajyarakshak Sambhaji)  त्यांना आम्ही सूडबुद्धीने न्याय करणार नाही अशी ग्वाही देतात.

Swarajyarakshak Sambhaji - माफी मागत असलेले पेशवे (Photo credit : Zee5)

त्यानंतर सदरेवर हजर होतात, जनार्दन पंत. जनार्दनपंत जिवंत असलेले पाहून सर्वांच्याच भुवया उंचावतात. मात्र ज्या डोळ्यात तेल घालून पंतांनी राज्यावर नजर ठेवली त्या डोळ्यांत शंभूराजे सळ्या कशा घालतील. पंतांनीही कबुलीजबाब दिला होता त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकली नाही. त्यानंतर शंभूराजे वळतात ते सोमाजीकडे. अनाजी आणि सोमाजी या उभयतांना युक्तीने मात दिली पाहिजे हे शंभूराजे ओळखतात, त्यामुळे, ‘गडाचे दरवाजे बंद असता संवेदनशील काळात एक परकी व्यक्ती राजधानीत घुसकोरी करतोच कशी? अष्टप्रधानांच्या गैरहजेरीत सदरेवर पाय ठेवतेच कशी? इतके नाही तर याने अष्टप्रधानांवर दबाव टाकून, अभिषिक्त युवराजांच्या विरोधात कट केला असा युक्तिवाद ते मांडतात. इथेच सोमाजी फसतो आणि हे सर्व आपण दादाच्या म्हणजेच अनाजीपंतांच्या सांगण्यावरून केले हे बोलून जातो.

सर्व कारभाऱ्यांचे कबुलीजबाब पार पडल्यावर शेवटी शंभूराजे वळतात राजद्रोहाच्या निवाड्याकडे. मात्र यावेळीही अनाजीपंतांची मग्रुरी कायम असलेली दिसते. अनाजीपंत आपली बाजू मांडायला सुरुवात करतात. 'आपण गडाचा दरवाजा बंद केला तो अराजक पसरू नये म्हणून, महाराजांच्या महानिर्वाणाची खबर दडवली ती शत्रूला संधी मिळू नये म्हणून, तसेच युवराज मोगले गोटातून आले असल्याने त्यांच्यावर नजर ठेवली. राजारामांचे मंचकारोहण केले ते महाराजांचे विधी करता यावेत म्हणून आणि हे सर्व केले ते सर्वांच्या संमतीने.' अशा प्रकारे आपल्या स्वार्थाला स्वराज्यहिताचे नाव देऊन लागलेला हरएक आरोप खोडून टाकण्याचा अनाजीपंत प्रयत्न करतात.

Swarajyarakshak Sambhaji - सोमाजी आणि अनाजी (Photo credit : Zee5)

हे पाहून चिडलेले शंभूराजे, अनाजीपंतांना त्यांच्या प्रत्येक कृत्यामागील दुराचाराचा पाढा वाचून दाखवतात. वडिलांच्या अग्निसंस्कारापासून थोरल्या मुलाला रोखले, वडिलांच्या मृत्यूची खबर मिळू नये म्हणून खुशालीचे खोटे खलिते पाठवले, अभिषिक्त युवराजांना नजरकैदेत ठेवले. त्यानंतर अटक करण्यासाठी पन्हाळ्यावर आलात अशा प्रकारे एक ना अनेक कटकारस्थाने रचलीत यात तो कुठला स्वराज्यहीत? असा सवाल शंभूराजे पुसतात, हे स्वराज्यहित नसून हा आहे स्वराज्यद्रोह.

Swarajyarakshak Sambhaji - सदरेवर सोयराबाईंचे नाव घेतल्यानंतर चिडलेले संभाजी महाराज (Photo credit : Zee5)

हे ऐकल्यावरही अनाजीपंतांच्या चर्येवरील भाव बदलत नाहीत. शेवटी ते गुन्हा मान्य करतात, शिक्षादेखील मान्य करतात. मात्र अगदी शेवटच्या घटकेला आपला मूळ रंग दाखवतात, आपल्याला जर वाचायचे असेल तर सोयराबाईसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलेले असते, त्यामुळे आदेश देणाराही गुन्हेगार असे सांगून अनाजी पंत सोयराबाईंनीच हे सगळे घडवून आणले असल्याचे सांगतात. राजमातोश्रींचे नाव एक गुन्हेगार म्हणून सदरेवर घेतले गेल्याचे पाहून शंभूराजे चिडतात आणि ते सदरेवरून रागाने बाहेर पडतात. आता सोयराबाईसाहेबांचाही निवाडा होणार का, हे कळेल आजच्या भागात.