जुईच्या 'प्रेमात' येऊ शकतो 'पॉइजन' मुळे 'पंगा'; पाहा काय म्हणते नागिणीची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे
ही निराळी भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे तिच्या या भूमिकेविषयी आणि मालिकेबद्दल काय सांगतेय, ते बघूया.
'झी युवा' (Zee Yuva) वाहिनीवरील 'प्रेम पॉयजन पंगा' या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर इच्छाधारी नागीण दिसणार आहे. ही निराळी भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे तिच्या या भूमिकेविषयी आणि मालिकेबद्दल काय सांगतेय, ते बघूया.
'प्रेम, पॉयजन, पंगा' या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
मला ऑडिशनसाठी बोलावलं गेलं. साधारणपणे 4-5 ओळींचं स्क्रिप्ट असेल अशी माझी अपेक्षा होती. पण जवळपास 20 ओळींचं स्क्रिप्ट बघून आधी मला भीती वाटली होती. एवढं पाठांतर करणं मला कठीण वाटत होतं. पण, वाचायला सुरुवात केल्यावर त्यातलं वेगळेपण मला जाणवलं. ही व्यक्तिरेखा फार वेगळी असल्याचं लक्षात आल्यामुळे मी योग्यप्रकारे मेहनत घेतली. या मेहनतीचं फळ मला मिळालं आणि ही वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली. अर्थात, मॉक शूट झाल्यावर सुद्धा अंतिम निर्णय कळेपर्यंत मनात धाकधूक होतीच. अंतिम निर्णय केल्यानंतर मात्र शूट कधी सुरु होईल याची उत्सुकता लागून राहिली होती.
तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांग.
जुई भोळे असं माझ्या भूमिकेचं नाव आहे. एकुलती एक असल्याने घरात सगळ्यांचीच फार लाडकी आहे. मजामस्ती करणं, आपल्या आवडीनिवडी जपणं याची तिला आवड आहे. सेल्फीक्वीन, टिकटॉकची आवड असलेली अशी ही मुलगी सोशल मीडियावर नितांत प्रेम करते. सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्ध सुद्धा आहे. मित्रमंडळींच्यात असतानाही आपली वेगळी छाप पडण्याची कला तिच्याकडे आहे. लहान मुलांची आवड असल्याने त्यांच्याशी खेळणं, त्यांना शिकवणं, या गोष्टी ती करत असते. थोडक्यात सांगायचं झालं, तर आयुष्य मजेत जगणारी बिनधास्त अशी तरुण म्हणजे 'प्रेम पॉयजन पंगा'मधील जुई!!! (हेही वाचा. आदिनाथ कोठारे करत आहेत निर्मितीत पदार्पण; 'इच्छाधारी नागीण' असलेली मालिका आता मराठीतही)
इच्छाधारी नागीण मराठी मालिकेत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. ही व्यक्तिरेखा तू साकारते आहेस. त्याविषयी काय सांगशील?
'इच्छाधारी' नागीण या शब्दातच एक गंमत आहे. जुई आपलं छान आयुष्य जगात असताना अचानक ती नागीण होते, त्यामुळे तिला दुहेरी जीवन जगावं लागणार आहे. आपल्या इच्छा पूर्ण करत असताना, इच्छाधारी नागीण असल्याचं भान जुईला ठेवावं लागतं. अर्थात, ती जरी नागीण असली, तरी कुणाचाही बदल घेण्यासाठी ती आलेली नाही. सगळयांना समजून घेणं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणं या गोष्टी तिला हव्या आहेत. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच नागीण अवतरणार आहे, हे जितकं खरं आहे, तितकंच ही नागीण वेगळी आहे यातही तथ्य आहे. ही निराळी भूमिका साकारताना मला सुद्धा खूप मजा येतेय. ही भूमिका सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे.
ही भूमिका साकारण्यासाठी काही खास मेहनत घ्यावी लागली का?
जुई ही एक बिनधास्त मुलगी आहे. तिला सेल्फीक्वीन म्हणावं, इतकी तिला सेल्फीजची आवड आहे. पण, अचानक ती नागीण असल्याचं तिला लक्षात येतं. नागीण झाल्यानंतरची जुई साकारत असताना, 'स'चा उच्चार लांबवण्याची गरज पडत आहे. यासाठी मेहनत घ्यावी लागते. इच्छाधारी नागिणीला, चंद्रप्रकाश, आग वगैरे गोष्टींपासून धोका असतो. त्यामुळे, हे पात्र साकारत असताना त्यानुसार अभिनय करण्याची गरज पडते. या गोष्टी आव्हानात्मक आहेत. अर्थातच, हे आव्हान पेलायची इच्छा सुद्धा 'इच्छाधारी' नागीण साकारण्यासाठी माझ्याकडे आहे.
जुईचा ह्या पंग्यावर प्रेक्षक किती प्रेम करतात हे बघणं औत्सुक्याचं आहे