Pune International Film Festival 2021 वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लांबणीवर; 18-25 मार्च दरम्यान ऑनलाईन माध्यमातून रसिकांच्या भेटीला

यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये जागतिक चित्रपट विभागामध्ये 26 निवडक सिनेमे दाखवले जाणार आहेत.

PIFF (संग्रहित - संपादित प्रतिमा)

भारतामध्ये कोरोना संकटाला येऊन वर्ष उलटलं असलं तरीही अद्याप धोका टळलेला नाही. मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये अजूनही कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने खबदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे नियम कायम आहे. दरम्यान सध्या कोरोना संकटाच्या दुसर्‍या लाटेच्या उंबारठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रात आता अधिक जागृतपणे वावरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा पुणे फिल्म फाउंडेशनचा १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वेळापत्रकामध्ये बदल करत तो 18-25 मार्च दरम्यान ऑनलाईन फॉर्मेट मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी माहिती देताना हा फिल्म फेस्टिवल आता ऑनलाईन होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान रसिकांना देखील यामध्ये सहभागी व्हायचे झाल्यास पिफच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 साठी पूर्वीच ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना नव्याने रजिस्ट्रेशनची गरज नाही.

यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये जागतिक चित्रपट विभागामध्ये 26 निवडक सिनेमे दाखवले जाणार आहेत. हे सिनेमे ऑनलाईन स्वरूपात रसिकांना 18-25 मार्च मध्ये पाहता येणार आहेत. यंदा ऑनलाईन होणार्‍या फिल्म फेस्टिवल मध्ये रसिकांना केवळ एकाच डिव्हाईस द्वारा लॉग ईन करता येणार आहे. तर दिवसभरासाठी एक सिनेमा उपलब्ध असेल तो रसिक 24 तासांत कधीही पाहू शकतात. सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना इमेल द्वारा लिंक पाठवली जाणार आहे.