Allu Arjun: 'अल्लू अर्जुन येण्यापूर्वीच चेंगराचेंगरी झाली...', आशयाच्या पोस्ट व्हायरल; पोलिंसाकडून कडक कारवाईचा इशारा

या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप करण्यात आले.

Photo Credit- X

Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun)आणि संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात (Stampede Case)खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करणाऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी कडक ताकीद दिली आहे. पुष्पा 2 (Pushpa 2) चित्रपटाच्या प्रीमियर वेळी संध्या थिएटर चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खोटी माहिती पसरवल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

अल्लू-अर्जुन येण्यापूर्वीच चेंगराचेंगरी झाल्याचा दावा 

4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या उपस्थितीत झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि एक मूलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस आणि अल्लू अर्जुन यांची वक्तव्ये समोर आली आहेत. सोशल मीडियावरही लोक वेगवेगळे दावे करत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अल्लू-अर्जुन येण्यापूर्वीच चेंगराचेंगरी झाल्याचा दावा केला जात आहे. आता या दाव्यांवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.(Allu Arjun: अल्लू अर्जुन आणि पुष्पा चित्रपट निर्मात्यांकडून चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटींची मदत जाहीर)

दावे निराधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे

"पोलिस विभागाने या घटनेच्या तपासादरम्यान मिळालेली वस्तुस्थिती व्हिडीओच्या रूपात जनतेसमोर यापूर्वीच मांडली आहे. परंतु काही लोकांनी जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अर्जुनच्या येण्याआधी चेंगराचेंगरी झाल्याचे या व्हिडीओवरून असे दावे निराधार असून ते जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर)

पोलिसांनी यापूर्वी तपासातील निष्कर्षांची माहिती देणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि लोकांना अफवांना बळी पडू नये असे आवाहन केले होते. पोलिसांची बदनामी करणाऱ्या किंवा तपास कमकुवत असल्याच्या खोट्या बातम्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. हैदराबाद पोलिसांनी लोकांना या प्रकरणाशी संबंधित विश्वसनीय पुरावे किंवा कोणतीही माहिती असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.