पु.ल. देशपांडे जयंती विशेष: घराण्याचे जसे 'कुलदैवत' असते तसे महाराष्ट्राच्या या 'पुलदैवता'च्या 5 सर्वोत्कृष्ट साहित्य कलाकृती
आज एक नजर टाकूया पुलंच्या 5 सर्वोत्कृष्ट साहित्य कलाकृतींवर.
पु. लं. देशपांडे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पुलं. आज त्यांची जयंती. या महाराष्ट्रात अशी व्यक्ती अगदी क्वचित सापडेल जिला पुलंबद्दल जुजबी माहितीदेखील नाही. पुलंचं साहित्य वाचलेला, ऐकलेलं, पाहिलेला प्रत्येक जण एक गोष्ट मात्र नेहमीच सांगू शकेल की तो आयुष्यात एकदा तरी खळखळून हसलाय. हसून हसून रडलाय आणि हसता हसता सुद्धा रडलाय. विनोदाचे टोचन देऊन अनभिज्ञ असलेल्या समाजाची बंद लोचनं हळूच उघडायचं काम त्यांच्याकडून नकळत घडून गेलं. आज एक नजर टाकूया पुलंच्या 5 सर्वोत्कृष्ट साहित्य कलाकृतींवर.
1. व्यक्ती आणि वल्ली
आजवरच्या मराठी साहित्याच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक म्हणून या पुस्तकाचे नाव घेता येईल. हे पुस्तक म्हणजे व्यक्तिचित्र कसे असावे याची शिकवणी आहे. नाथा कामत, अंतू बर्वा, नारायण, नंदा प्रधान, पेस्तनजी, बबडू असे एका पेक्षा एक नमुने या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. पण बऱ्याच ठिकाणी हसवत हसवत पुलं हळूच डोळ्यात पाणी आणतात. मग ते वरात निघाल्यानंतर दगदगीमुळे थकून सोफ्यावर एकटाच झोपलेला पण कुणाचंच लक्ष नसलेला नारायण असो किंवा विश्वाचं अगाध तत्वज्ञान 2 ओळीत मांडणारा अंतू बर्वा असो, त्या त्या ठिकाणी अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.
2. अपूर्वाई
पुलंनी 3 प्रवासवर्णनं लिहिली. पूर्वरंग, वंगचित्र आणि अपूर्वाई. पूर्वरंग हे पूर्वेकडील प्रवासाचा चित्रण होतं. वंगचित्र हे पूर्णपणे प्रवासवर्णन नाही म्हणता येणार. कारण त्यांनी टागोरांच्या शांती निकेतन मध्ये घालवलेला काळ त्यात मांडला आहे . तर अपूर्वाई हे पश्चिमेकडील प्रवासवर्णन आहे. कपडे शिवतानाची धांदल, प्रवासाला निघतानाची मजा, तिथे उडालेला गोंधळ हा आपल्याला खळखळून हसवतो. एकदा तरी वाचावेच असे हे पुस्तक.
3. रसिकहो
पुलं एक समाजाचं भान असलेले साहित्यिक होते. तसेच एक समाजप्रिय व्यक्तिमत्व होते. अनेक अध्यक्षीय जबाबदाऱ्या देखील त्यांनी पार पाडल्या. त्यानिमित्ताने अनेक अध्यक्षीय भाषणं केली. मराठी साहित्य संमेलनासोबत अनेक साहित्य संमेलनात आवर्जून सहभाग घेतला. त्याच भाषणांचं पुस्तक म्हणजे रसिकहो.
4. बटाट्याची चाळ
चाळ म्हटलं की गोंधळ, गडबड. पण बटाट्याची चाळ म्हटलं की राडा. बटाटयाची चाळ ही पुंच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक म्हणता येईल. 100 हुन जास्त पात्र त्यांनी जिवंत केली आहेत. आणि प्रत्येक पात्र दुसऱ्या पात्रापेक्षा पूर्णतः वेगळं. हीच तर त्यांची खासियत. एक अक्खी 3 मजली चाळ आणि त्यातील गमतीजमती पुलं अशा उभ्या करतात की आपल्याला वाटतं आपण सुद्धा त्या चाळीचाच एक भाग आहोत.
5. एक शून्य मी
पुलं म्हणजे फक्त विनोद या अत्यंत चुकीच्या गैरसमजाला छेद देणारं पुस्तक म्हणजे एक शून्य मी. यामध्ये पुलंनी मांडलेले विषय आणि तत्वज्ञान हा पुलंच्या उच्च प्रतिभेचा दाखला आहे. आपण ज्या गोष्टींच्या इतके मागे लागलो आहोत त्या गोष्टी मिळाल्यानंतर किंवा निसटून गेल्यानंतर त्यातील फोलपणा आपल्याला जेव्हा कळतो तेव्हा आपली स्वतःबद्दलची होणारी जाणीव म्हणजे एक शून्य मी.
इतकंच नाही तर पुलंचं बाकीचेही साहित्य वाचा आणि पुलंची जयंती योग्य तर्हेने साजरी करा.