नाना पाटेकर यांच्या 'नाम' फाऊंडेशन ने PM आणि CM सहायक निधीला केली प्रत्येकी 50 लाखांची मदत

नाना पाटेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायक निधी ला प्रत्येकी 50 लाखांची अशू एकूण 1 कोटींची मदत जाहीर केली आहे.

Narendra Modi Nana Patekar Uddhav Thackeray (Photo Credits: FB)

कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढा देण्यासाठी सरकारसह सर्व ताकदीनिशी कला, मनोरंजन, राजकारणातील सर्व दिग्गज व्यक्ती तसेच सामाजिक संस्था मदतीला आल्या आहेत. या विषाणूला हरविण्यासाठी यातील प्रत्येकजण आपापल्या परीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायक निधीला मदत करत कोरोना ग्रस्तांसाठी धावून आले आहेत. यांच्यात आता आणखी एक नाव जोडले गेले आहे ते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या 'नाम' फाऊंडेशनचे. नाना पाटेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायक निधी ला प्रत्येकी 50 लाखांची अशू एकूण 1 कोटींची मदत जाहीर केली आहे.

या संदर्भातील एक व्हिडिओ नाना पाटेकर यांनी ट्विटरवर शेअर करुन "या क्षणाला आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ विसरुन सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या आपत्तीशी सरकार एकटं नाही लढू शकणार. आपण आपआपला वाटा उचलायला हवा. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पीएम आणि सीएम फंडासाठी प्रत्येकी ५० लाख पाठवणार आहोत" असे सांगितले आहे.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- भारतात गेल्या 24 तासांत COVID-19 चे 227 नवीन रुग्ण, देशात रुग्णांची संख्या 1251 वर

त्याचबरोबर घराबाहेर न पडणे ही या क्षणाला सगळ्यात मोठी देशसेवा ठरेल असेही नानांनी म्हटले आहे. देशभरात लॉकडाऊन असले तरीही कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होतच चालली आहे. त्यात गेल्या 24 तासांत भारतात 227 नवे रुग्ण आढळल्याची नवी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात एकूण रुग्णांची 216 वर गेली असून मुंबईतील रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वारंवार घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. देशभरात करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. संचारबंदी आणि लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.