शोले सिनेमात कालिया साकारणाऱ्या विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
वयाच्या 78व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील 300 हुन अधिक दर्जेदार सिनेमा मध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात घर केलेले ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे (Viju Khote) यांचे आज (30 सप्टेंबर )वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 78व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, आज सकाळी त्यांनी गावदेवी (Gaondevi) येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला.
विजू खोटे यांनी आजवर अनेक कॉमेडी भूमिका आपल्या हटके शैलीत वठवल्या आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील ऑल टाइम हिट मानल्या जाणाऱ्या शोले मधील त्यांनी साकारलेला कालिया आणि डायलॉग "सरदार मैने तो आपका नमक खाया है" किंवा अंदाज अपना अपना मधील "गलती से मिस्टेक होगया" हे तर अजूनही साऱ्यांच्या लक्षात आहेत. अशा हरहुन्नरी आणि प्रतिभावंत नटाच्या जाण्याने चाहते व कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
विजू खोटे यांच्या स्मृतीस लेटेस्टली मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली!