Timepass 3: आईबाबा आणि साईबाबा शप्पथ! टाईमपास 3 येतोय, दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली घोषणा
या चित्रपटाचा तिसरा पार्ट म्हणजेच 'टाईमपास 3' (Timepass 3) येणार असल्याचे घोषणा स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केली आहे.
नया है वह, एकशे त्रेचाळीस, आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ हे डायलॉग आजही आपल्या कानावर पडले की, दगडू आणि प्राजक्ताची आठवण आल्याखेरीज राहणार नाही. रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास' (Timepass) चित्रपटातून अनेकांना आपलं तरूणपणीचे प्रेम तर काहींना पहिले प्रेम देखील आठवले असेल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर टाईमपास 2 (Timepass 2) आला. त्यात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट प्रमुख भूमिकेत होते. आता या चित्रपटाचा तिसरा पार्ट म्हणजेच 'टाईमपास 3' (Timepass 3) येणार असल्याचे घोषणा स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केली आहे.
रवी जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याबाबत घोषणा केली असून 3 आकडा असलेला फोटो शेअर केला आहे. याखाली 'लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.' असे सांगत रवी जाधव यांनी सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्ट खाली रवी जाधव या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग 'आईबाबा आणि साईबाबा शप्पथ' देखील लिहिला आहे.हेदेखील वाचा- Ratris Khel Chale 3 Teaser: सावधान! अण्णा नाईक परत येतायत, 'रात्रीस खेळ चाले 3' चा भयभीत करणारा टीजर आला समोर, Watch Video
2014 साली आलेल्या टाईमपास ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटातील संवाद, कलाकार, गाणी सर्वकाही जबरदस्त हिट झाले होते. प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, भाऊ कदम, मेघना एरंडे हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर दगडू आणि प्राजक्ता मोठे झालेले दाखवत टाईमपास 2 आला. यात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट धमाल उडवून दिली होती. त्यात रवी जाधव यांनी याच्या तिस-या भागाची घोषणा केल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली.
टाईमपास 3 मध्ये काय नवीन पाहायला मिळणार?, यात कोण कलाकार असणार, कोणती गाणी असणार या सर्वांबाबत जाणून घ्यायची चाहत्यांना उत्सुकता आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत एक फोटो शेअर केलाय. त्यामुळे टाईमपास चित्रपटाच्या तिस-या भागात हृता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत दिसणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.