ऑक्टोबर ठरेल मराठी चित्रपटांच्या चुरशीचा महिना

मराठी चित्रपटांसाठी सप्टेंबर महिना तितकासा अनुकूल ठरला नाही, ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेला सुबोध भावेचा 'सविता दामोदर परांजपे' हा एक चित्रपट वगळता इतर कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी केली नाही. मात्र ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी पाहता पुढच्या महिन्यात काही दर्जेदार चित्रपट पाहायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.

बॉइज २

‘बॉईज’ या मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या ‘बॉईज २’ मध्येदेखील बॉईजची तीच धम्मालमस्ती अनुभवता येणार आहे. या चित्रपटामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Once मोअर

चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. ‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’ अशी टॅग लाईन असलेल्या या चित्रपटाच्या गोष्टीचा रहस्यभेद १२ ऑक्टोबरला होणार आहे. आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या नव्या चेहऱ्यांसोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे.

शुभ लग्न सावधान

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘शुभ लग्न सावधान’द्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये तब्बल दोन वर्षांनतर प्रेक्षक सुबोध आणि श्रुती यांना एकत्र पाहतील, त्यामुळे चाहत्यांसाठी ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट एक मेजवानी ठरणार आहे, हे निश्चित !

एक सांगायचंय... UNSAID HARMONY

देवी सातेरी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या, अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय... UNSAID HARMONY' हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर १८ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधून प्रसिद्ध अभिनेता के. के. मेनन मराठीत प्रमुख भूमिकेतून पदार्पण करत आहे. पुष्पांक गावडे यांची सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कला दिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांची वेशभूषा लाभलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खास अपेक्षा आहेत.

माझा अगडबम

सुपरहिट 'अगडबम'चा दमदार सिक्वल असलेला 'माझा अगडबम' हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरचा हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे.