केदार शिंदे दिग्दर्शित 'वाजले कि बारा!' या नावाने 'द प्ले दॅट गोज राँग' आता मराठीत

बाॅलीवूड अभिनेता शर्मन जोशीच्या शर्मन जोशी प्राॅडक्शन प्रस्तुत आणि स्वामी क्रिएशन निर्मित या नाटकाचा श्रीगणेशाही झाला. महाराष्ट्र दिन औचित्य साधत सिद्धिविनायकाच्या चरणी या नाटाकाच प्रयोग करण्यात आला.

The Play That Goes Wrong Drama In Marathi

वेस्टएन्ड आणि ब्राॅडवे म्हणजेच, लंडन अमेरिकेत गाजलेल्या 'द प्ले दॅट गोज राँग' (The Play That Goes Wrong) नाटकाचा अधिकृत रिमेक आता मराठीत येत आहे. 'वाजले कि बारा!' (Vajale ki bara!) असे या नावाने हे नाटक मराठीत येत आहे. मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांवर आपली मोहोर उमटवणारे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. बाॅलीवूड अभिनेता शर्मन जोशीच्या शर्मन जोशी प्राॅडक्शन प्रस्तुत आणि स्वामी क्रिएशन निर्मित या नाटकाचा श्रीगणेशाही झाला. महाराष्ट्र दिन औचित्य साधत सिद्धिविनायकाच्या चरणी या नाटाकाच प्रयोग करण्यात आला.

जुलै-ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या नाटकाद्वारे शर्मन जोशी प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून मराठी नाट्यसृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकत आहे.

'द प्ले दॅट गोज राँग' हे नाटक वेस्टएन्ड व ब्रॉडवे म्हणजेच लंडन आणि अमेरिकेत सुपरहिट चालत आहे. हे नाटक केदार - शर्मन जोडीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत भारतात सादर करण्याचे धाडस यापूर्वी केले होते. विशेष म्हणजे, 'द प्ले दॅट गोज राँग' च्या ह्या रिमेकला भारतीय प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ह्या नाटकाचा मराठी रिमेक असलेलं 'वाजले कि बारा!’हे नाटक मराठी प्रेक्षकांनादेखील आवडेल, याची खात्री ह्या दोघांना आहे. (हेही वाचा, 'दहा बाय दहा' नाटकाद्वारे विजय पाटकर, प्रथमेश परब मराठी रंगभूमीवर देणार विनोदाची फोडणी)

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेली 'तू तू मी मी', 'सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदर पंत', 'गेला उडत', 'सौजन्याची ऐशी तैशी' यांसारखी दर्जेदार नाटकं मराठी रंगभूमीवर गाजली. मात्र त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदी आणि गुजराती नाटकाकडे वळवला होता. 'वाजले कि बारा!’च्या निमित्ताने केदार शिंदे तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे परतले आहेत.

केदार शिंदे यांनी 'सही रे सही' हे नाटक शर्मनच्या सोबतीने 'राजू राजा राम और मैं' या रिमेकद्वारे हिंदी रंगभूमीवर आणलं होतं. गुजराती, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर सुपरहीट ठरलेली केदार-शर्मनची जोडी, आता मराठी रंगभूमीवर धम्माल करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे 'द प्ले दॅट गोज राँग' चे मराठी व्हर्जन कसं असेल, याची उत्सुकता नाट्यरसिकांना लागली नसेल तर नवलच !