लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे पडली प्रेमात? अफेअरच्या चर्चा रंगू लागल्यानंतर डिलीट केली 'ती' भावनिक पोस्ट
स्वानंदीला स्वप्नातला राजकुमार मिळाला अशा आशयाच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. त्यांनतर आता स्वानंदीने हा फोटो डिलीट केल्याचे दिसत आहे
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन्ही मुले मुलगा अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) यांना तुम्ही ओळखताच. अभिनय सध्या चित्रपट विश्वात वावरत आहे तर दुसरीकडे स्वानंदीदेखील लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ही दोन्ही मुले नेहमीच कोणत्या ना कोणत्या बाबतीत चर्चेत असतात. आता स्वानंदी तिच्या सोशल मिडियावरील एका फोटोमुळे चर्चेत आहे. नुकतेच स्वानंदीने सोशल मिडियावर एका मुलासोबतचा फोटो शेअर केला होता, ज्यासोबत तिने भावनिक कॅप्शन लिहिले होते. हा फोटो क्षणार्धात व्हायरल झाला व स्वानंदीच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर आता तिने हा फोटो डिलीट केला आहे.
स्वानंदीने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘प्रेम मोदी’ (Prem Modii) या तरुणासोबतचा फोटो शेअर केला होता. तिने लिहिले होते, ‘तुझ्या चेहऱ्यावरचे हे हास्य पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आयुष्यातील कठिण काळात आपण एकमेकांसोबत होतो. तो काळ आपल्याला जवळ घेऊन आला. आता मला तुझी इतकी सवय झाली आहे की मला एकटीला भीती वाटते. खूप प्रेम'.’
हा फोटो शेअर केल्यावर स्वानंदी व प्रेम हे प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. स्वानंदीला स्वप्नातला राजकुमार मिळाला अशा आशयाच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. त्यांनतर आता स्वानंदीने हा फोटो डिलीट केल्याचे दिसत आहे.
प्रेमनेही असाच एक फोटो पोस्ट करत स्वानंदीबद्दलच्या भावना ;व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिले आहे. ‘आमच्या मैत्रीचे अचूकपणे प्रतिनिधित्व करणारा हा फोटो आहे. माझ्या जीवनातल्या सर्वात कठीण काळात तू माझा हात धरलास, माझ्या खराब विनोदांवर हसलीस. हे वेड्या मुली तू माझ्या आयुष्यातील शक्ती आहेस. तुला माहिती नाही त्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. माझे डबल मिनिंगचे विनोद आणि स्वतःवर असलेले प्रेम सहन केल्याबद्दल धन्यवाद.’ (हेही वाचा: बिग बॉस मराठी 1 मधील आणखी एक स्पर्धक चढणार बोहल्यावर, लग्नासाठी निवडला प्रेमाचा दिवस!)
दरम्यान. यंदा स्वानंदी बेर्डे आणि सुमेध मुद्गलकर यांचा 'मन येड्यागत झालं' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. स्वानंदीने किशोर बेळेकर दिग्दर्शित अजून एका चित्रपटात काम केले आहे. तोदेखील यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.