Dharmaveer: प्रसाद ओक यांना आनंद दिघे यांच्या रुपात बघून बहिण अरुणाताई झाल्या भावूक !

मनटापासून ते अगदी खांद्यापर्यंत राख्या बांधलेल्या असायच्या. या सगळ्या राख्यात एक अतिशय हक्काची आणि लहानपणापासून त्यांच्या हातावर बांधली जायची अशी राखी म्हणजे त्यांच्या सख्या बहिणीची ...अरूणाची. वयाच्या पंचाहत्तरीत पोहचलेल्या अरुणा गडकरी आजही आपल्या या लाडक्या भावाच्या आठवणीने गहिवरून जातात.

'धर्मवीर' मुक्काम पोस्ट ठाणे (Dharmaveer) या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. आनंद दिघे हे कुणासाठी वडिलांसमान होते, कुणासाठी मुलगा तर कुणासाठी भाऊ होते. ठाण्यातील महिलांच्या समस्या सोडवणारा, अपप्रवृत्तीपासून त्यांचं रक्षण करणारा आणि रक्षा बंधनाच्या वचनाला जागणारा असा हा समस्त महिला वर्गाचा भाऊ होता. असं म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून जायचे. मनटापासून ते अगदी खांद्यापर्यंत राख्या बांधलेल्या असायच्या. या सगळ्या राख्यात एक अतिशय हक्काची आणि लहानपणापासून त्यांच्या हातावर बांधली जायची अशी राखी म्हणजे त्यांच्या सख्या बहिणीची ...अरूणाची. वयाच्या पंचाहत्तरीत पोहचलेल्या अरुणा गडकरी आजही आपल्या या लाडक्या भावाच्या आठवणीने गहिवरून जातात.

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या लूकमध्ये सर्वांसमोर हजर झाला आणि सर्वांना अरे हे तर हुबेहूब दिघे साहेब असा भास झाला. या सोहळ्याला अरुणाताईसुद्धा उपस्थित होत्या. प्रसादला या रुपात बघून त्या थक्क झाल्या. प्रसादला समोर बघून त्यांना अक्षरशः गहिवरून आलं होतं, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आज माझा भाऊ मला परत भेटला असं त्या म्हणाल्या आणि उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की "मला माहित आहे की प्रसादने केवळ हे रूप धारण केलं आहे, हा चित्रपट आहे, हा खरा आनंद नाहीये पण तरीही मन हे मानायला तयार नाहीये इतकं ते खरं खरं रुप प्रसादने साकारलंय. मी चित्रपटाचा टिझर बघितला तेव्हाच भारावून गेले होते आणि आज प्रसादला प्रत्यक्ष त्या रुपात बघून तर जणू काय माझे भानच हरवले आहे. मला शब्दही सुचत नाहीये. मी एवढंच म्हणेन की आज प्रसादाच्या या रूपाने माझा आनंद मला परत एकदा भेटला." (हे देखील वाचा: Bharath Majha Desh Aahe Trailer: जवानांच्या कुटुंबियांवर भाष्य करणाऱ्या 'भारत माझा देश आहे'चा ट्रेलर प्रदर्शित)

प्रसादही अरूणाताईंच्या जवळ बसून त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला की," मीही तुमचा भाऊच आहे असं समजा. आज मलाही एक बहिण मिळाली याचा आनंद होतोय. मी खरंच भाग्यवान आहे. ज्या माणसावर लोकं एवढं निरपेक्ष प्रेम करतात त्या माणसाची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझं भाग्यच आहे." झी स्टुडियोज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.