सातारचा सलमान 11 ऑक्टोबर ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे ने शेअर केले सिनेमाचे पहिले पोस्टर
भारतीयांचं सिनेमा वेड हा तसा कधीही न संपणारा विषय त्यामुळे साहजिकच खेड्यापाड्यापासून सर्वत्र सिनेमा व परिणामी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावाचा बोलबाला कायम पाहायला मिळतो. काही मंडळीची तर या सेलिब्रिटींवर एखाद्या देवाप्रमाणे निष्ठा, श्रद्धा असते. अनेकदा हे लोक आपल्या मुलांची नावं सुद्धा सेलिब्रिटींवरूनच ठेवतात त्यामुळे आपल्याकडे पाहायला गेल्यास प्रत्येक गल्लीतून एखादा सलमान, शाहरुख, माधुरी, करीना तर हमखास सापडेल. याचपप्रमाणे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता चक्क सातारचा सलमान (Satarcha Salman) सुद्धा येणार आहे. अभिनेता, लेखक- दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) याचा हा नवा कोरा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याने नुकतेच सिनेमाचे पहिले पोस्टर आपल्या इन्स्ट्राग्राम अकाउंट वरून शेअर केले आहे.
सातारचा सलमान या सिनेमाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये सलमान कोण याबाबत उत्सुकता होती. या सिनेमाच्या पोस्टरवरून आता या ही प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.आजवर गर्लफ्रेंड, बसस्टॉप, आम्ही बेफिकर, शेंटिमेंटल, कृतांत यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या समोर आलेला 'सुयोग गोऱ्हे' हा सिनेमात मुख्यवर्ती भूमिकेत असेल. सिनेमाचे नाव जरी सलमान वरून असले तरी मुख्य पात्र हे अमित काळभोर नामक असून ही एका सर्वसामान्य घरातील तरुणाची कथा असणार आहे.
सातारचा सलमान पोस्टर
दरम्यान, हेमंत ढोमे याने या सिनेमातून काहीतरी मजेशीर विषय मांडला असणार आहे, साधारण मुलाची सलमान ही हटके ओळख आणि त्याला हेमंतच्या विनोदी शैलीची जोड म्हणजे प्रेक्षकांचे भन्नाट मनोरंजन होणार हे नक्की मात्र त्यासाठी आपल्याला 11 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.