'बकाल' सिनेमाच्या माध्यमातून अशोक पत्की पहिल्यांदाच रसिकांसमोर आणणार 'आयटम सॉन्ग'

बॉलिवूडच्या तोडीचा मराठीतील हा पहिला भव्यदिव्य असा अॅक्शनपट आहे.

Bakaal Music Launch (Photo Credits: Latestly)

समीर आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेंडा निर्मित 'बकाल' (Bakaal) या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा मुंबईत पार पडला. बॉलिवूडच्या तोडीचा मराठीतील हा पहिला भव्यदिव्य असा अॅक्शनपट आहे. ह्या चित्रपटातून चैतन्य मेस्त्री आणि जुई बेंडखळे ही जोडी पाहायला मिळणार आहे किंबहुना हे दोघे या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. जुई ही झी-मराठी वाहिनीवरील एकापेक्षा एक तसेच मटा श्रावणन क्वीन 2017 या प्रतिष्ठित स्पर्धात्मक कार्यक्रमांची उपविजेती ठरलेली आहे. अॅक्शनच्या तोडीस तोड असे ह्या चित्रपटाचे संगीत आहे. अनेक कलाकारांच्या मांदियाळीत या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला.

हा चित्रपट तरुणाई आणि आधुनिक बाजाचा असल्याने त्याचे संगीतही तितकेच उठावदार असायला हवे, या हेतून संगीतकाराची निवड करताना दिग्दर्शक समी आठल्ये यांनी अशोक पत्की यांची निवड केली. समीर आठल्ये हे धाडस पाहून सर्वच जण अवाक् झाले होते. इतकेच नव्हे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना धक्काच बसला होता. "आपला हा प्रांत नसल्याने आपण समीर आठल्येनां तात्काळ नकार कळवला होता" असे अशोक पत्की या म्युझिक लाँच वेळी म्हणाले.

Bakal Music Launch (Photo Credits: Latestly)

अखेर समीरजींनी त्यांना राजी केले. अशोक पत्की यांनी स्वत:ची प्रचलित चौकट मोडून गीतकार मंदार चोळकर यांच्या रचनांवर आधारित तरुणाईला ठेका धरायला लावणारे संगीत निर्माण केले. एवढच नव्हे तर त्यांनी आजवर कधीही न केलेले आयटम साँगही रचले. या सिनेमात एकूण सहा गाणी आहेत. जी खूपच हटके आणि श्रवणीय आहेत. ज्यांना सिद्धार्थ महादेवन, अमेय दाते, जसराज जोशी, आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, महालक्ष्मी अय्यर, जान्हवी अरोरा, प्राजक्ता रानडे, कविता राम, धनश्री देशपांडे, अमृता दहीवेलकर यांनी स्वरसाज चढविला आहे.

हेही वाचा- Exclusive: तुझ्यात जीव रंगला एक्सिटच्या अफवा; शोला मिळणार नवा टाइम स्लॉट

या चित्रपटात अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, अशोक समर्थ, मिलिंद गवळी, प्रदीप वेलणकर, जयंत सावरकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अडीचशेहून अधिक चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केलेले सुप्रसिद्ध कॅमेरामन समीर आठल्ये यांचे दिग्दर्शक असलेला हा चित्रपट येत्या 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.