रशियात पहिल्यांदाच प्रदर्शित होणार एक मराठी चित्रपट; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या 'काळ' चित्रपटाचा ट्रेलर नक्की पहा
Kaal Movie To Release In Russia: मराठी सिनेसृष्टीने आणखी एक मनाचा तुरा कमावला आहे तो म्हणजे आता एक मराठी सिनेमा पहिल्यांदाच रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे.
Kaal Movie To Release In Russia: मराठी सिनेमांसाठी सुवर्ण काळ आला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण अगदी सातासमुद्रापार आजकाल मराठी चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर मराठी सिनेमे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये देखील भारताचा झेंडा फडकवताना दिसतात. याच मराठी सिनेसृष्टीने आणखी एक मनाचा तुरा कमावला आहे तो म्हणजे आता एक मराठी सिनेमा पहिल्यांदाच रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे.
संदिप खरात निर्मित काळ हा मराठी चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता येत्या 24 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहतानाच आपल्या काळजाचा थरकाप उडतो. आनंदाची बाब म्हणजे हा सिनेमा केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर रशियामध्येही प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट, रशियातील 30 शहरांमधील एकूण 100 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या चौथ्या चित्रपट महोत्सवादरम्यान 'काळ' सिनेमाच्या प्रीमिअरचं आयोजन केलं जाणार आहे.
Jhund Teaser: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमाचा दमदार टीझर; अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत!
दरम्यान, ‘काळ’चे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन या सर्वांची जबाबदारी सांभाळली आहे डी. संदीप यांनी. तर चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रुपारेल आणि रणजीत ठाकूर तसेच नितिन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांनी मिळून केली आहे. चित्रपटाची स्टारकास्ट पाहता सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसतील.