Film City in Maharashtra: कोल्हापूर येथे सुरु होणार राज्यातील दुसरी चित्रनगरी; चित्रपट-मालिका निर्मिती, पर्यटनासह रोजगाराला मिळणार चालना
स्थानिक पातळीवर रोजगाराला संधी उपलब्ध होण्याबरोबरच राज्यातील चित्रपट व मालिका निर्मिती संस्थांसाठी ही दुसरी चित्रनगरी चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे.
राज्यात लवकरच कोल्हापूर (Kolhapur) येथे चित्रनगरी (Film City) सुरु होणार आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीतील विकास कामे वेगाने मार्गी लावून, नूतनीकृत चित्रनगरी मे-2024 पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात कोल्हापूर चित्रनगरीच्या नूतनीकरण आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरी येथे सुरु असलेल्या विविध कामांसंदर्भातील सादरीकरण व्यवस्थापकीय संचालक पाटील यांनी केले. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी त्या अनुषंगाने विविध कामांची तपशीलवार माहिती घेतली. कोल्हापूर येथील चित्रनगरीतील प्रस्तावित विकास कामांमध्ये चित्रीकरणासाठी बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, तीन वसतिगृहे, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडिओ अशी चित्रीकरण स्थळे, अंतर्गत रस्ते, वीज व पाणी पुरवठा, मलनि:स्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. (हेही वाचा: Jobs for Transgender in PMC: एक पाऊल पुरोगामी!, पुणे महापालिका सुरक्षा रक्षक पदावर ट्रान्सजेंडर्सना संधी)
त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि स्थळेही येथे विकसित करण्यात येणार आहेत. चित्रीकरणासोबतच येथे पर्यटनाला चालना मिळेल, अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराला संधी उपलब्ध होण्याबरोबरच राज्यातील चित्रपट व मालिका निर्मिती संस्थांसाठी ही दुसरी चित्रनगरी चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे येथील विकासालाही अधिक चालना मिळेल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.