'Dhurala' Star Cast Poster Out: सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी यांच्यासह मराठीतील 'या' लोकप्रिय कलाकारांवर रंगांची उधळण करणा-या 'धुरळा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
'धुरळा' असं या चित्रपटाचे नाव असून नुकतच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
आनंदी गोपाळ, डबल सीट आणि टाईम प्लीज यांसारख्या दमदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे समीर विद्वांस (Sameer Vidwans) आता एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. 'धुरळा' असं या चित्रपटाचे नाव असून नुकतच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये मराठी सिनेसृष्टीची शान अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सई ताम्हणकर (Sai Tamhankar), अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), अमेय वाघ (Amey Wagh), प्रसाद ओक (Prasad Oak) आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) दिसत आहे. हा पोस्टर पाहून सर्वच प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
झी स्टुडिओज मराठी ने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये या चित्रपटातील प्रमुख कलाकारांवर रंगांची उधळण करण्यात आली आहे.
पाहा या पोस्टरची एक झलक
या चित्रपटाच्या लेखनाची धुरा क्षितिज पटवर्धन यांनी सांभाळली असून झी स्टुडिओज, अनीश जोग, रणजित गुगळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टरवरून हा चित्रपट 3 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे कलाकार सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी आणि सोनाली कुलकर्णी यांनी #पुन्हानिवडणूक या हॅशटॅग सोबत ट्विट केले होते. आणि त्यांच्या या ट्विट नंतर लगेचच नेटकऱ्यांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी ते भाजपसाठी काम करत असल्याचे आरोपही त्यांच्यावर केले. आणि म्हणूनच या सर्व कलाकारांनी पुन्हा एक ट्विट करत सर्वांची माफी मागितली व त्यांच्या #पुन्हानिवडणूक या हॅशटॅग वापरण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले. हा नवा हॅशटॅग म्हणजे या कलाकारांची 'धुरळा' चित्रपटासाठी वापरलेली प्रमोशनल स्ट्रॅटेजी होती असे स्पष्ट केले.