Coronavirus: अशोक सराफ व निवेदिता जोशी यांनी खास आमरस-पुरी खाऊ घालून मानले पोलिसांचे आभार

कोरोना वॉरियर्स, म्हणजेच डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार इ. स्वत: धोका पत्करून देशाच्या सेवेत गुंतलेले आहेत, लोकांची मदत करत आहेत

निवेदिता सराफ (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या संपूर्ण देश कोविड-19 (Coronavirus) बरोबर झुंज देत आहे. कोरोना वॉरियर्स, म्हणजेच डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार इ. स्वत: धोका पत्करून देशाच्या सेवेत गुंतलेले आहेत, लोकांची मदत करत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार अशा वॉरियर्सच्या मदतीला धावून येत आहे. अनेक स्टार्सनी आपापल्या परीने अशा योद्ध्यांना जमेल तशी मदत केली आहे. अशात चित्रपट अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) आणि त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ (Nivedita Saraf) यांनी पोलिसांचे आभार मानण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना आमरस-पुरीचे (Aamras-Puri) जेवण खाऊ घातले आहे.

या जोडीने आपल्या या कृत्याद्वारे अनेकांची मने जिंकली आहेत. अभिनेता अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता यांनी गेल्या मंगळवारी ओशिवरा पोलिस ठाण्यात ड्यूटीवर असलेल्या पोलिसांसाठी, आमरस आणि पुरी यांचे 180 फूड प्लेटची व्यवस्था केली. याबाबत ते म्हणाले, ‘कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना आंब्याचा आनंद घेता येत नाहीये, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्याची आणि त्याचे आभार मानण्याची ही योग्य संधी आहे, असे समजून आम्ही ही छोटीशी गोष्ट केली.’ एका स्थानिक केटररच्या मदतीने पोलिसांना आमरस आणि पुरीचे जेवण देण्यात आले. (हेही वाचा: कलाकारांनी केलेल्या कामाचे पैसे द्या, अन्यथा त्यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल - निया शर्मा)

याबाबत अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहे व त्यांना आपली ही भेट सादर केली आहे. दरम्यान, यापूर्वी बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सनी पोलिस, डॉक्टर, सफाई कामगार आणि साथीच्या आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी हातभार लावला आहे. यात अभिनेता अक्षय कुमार, सोनू सूद, फरहान अख्तर, उर्वशी राउतेला आणि हृतिक रोशन यांची नावे आहेत.